USA-IRAN : इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध छेडलेल्या युद्धाला आज 40 दिवसांनंतर अचानक कलाटणी मिळाली. कालपर्यंत इराणला एका रात्रीत बेचिराख करून टाकण्याच्या धमक्या देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अचानक दोन आठवड्यांसाठी युद्धबंदी झाल्याची घोषणा केली. इराणने यावर अमेरिकेपुढे दहा अटी मांडल्या आहेत. इराणने ही तात्पुरती युद्धबंदी मान्य केली असली तरी शुक्रवारी इराणच्या अटींबाबत पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरात चर्चा होणार आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर युद्ध कायमचे थांबेल, ट्रम्प यांना या युद्धातून माघार घ्यावीच लागणार असल्याने चर्चा सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. त्यातूनच आज शेअर बाजाराने उसळी घेतली. मात्र इस्रायलने अजूनही लेबनॉनवर हल्ले सुरूच राहतील असे जाहीर केले आहे.
गेले सुमारे चाळीस दिवस संपूर्ण जगाला भेडसावणारी इंधन तुटवड्याची समस्या युद्धबंदीमुळे आता दूर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इराणविरुद्ध युद्धाला सुरुवातीपासून विरोध करणार्या अमेरिकेतील खासदारांनी युद्धविरामाची घोषणा होताच ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची आग्रही मागणी करून ट्रम्प यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित करताना ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मध्यस्थीमुळे आपण हा प्रस्ताव मान्य केला असे सांगत शरीफ यांचे जाहीर आभार मानले. आजचा दिवस विश्वशांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असे ट्रुथ सोशलवर पोस्ट करीत ट्रम्प यांनी या निर्णयाची भलामण केली. दुसरीकडे इराणने युद्धविराम म्हणजे इराणचा विजय आहे, अशी जाहीर भूमिका घेतली. इराणच्या जनतेनेदेखील युद्धविरामाचे जल्लोषात स्वागत केले. इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. हातात देशाचा राष्ट्रध्वज घेतलेल्या इराणी नागरिकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. तेहरानमधील या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. इराणचे सरकार आणि सरकारी प्रसारमाध्यमांनी हा इराणचा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. इराणने आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य केली असून, शत्रूला घोर अपयशाचा सामना करावा लागत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. इराण प्रमाणे इस्रायलमध्येही नागरिकांनी जल्लोष केला.
होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत मंगळवारी रात्री अमेरिकेत आठ वाजता संपत होती. तोपर्यंत जर इराणने होर्मुज खुली केली नाही तर आजवर कोणीच कोणावर केला नसेल असा भीषण हल्ला करून संपूर्ण इराण बेचिराख करू, असा निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री नेमके काय होते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. ट्रम्प यांच्या या निर्वाणीच्या इशार्यानंतरही इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहिला होता. त्यामुळे युद्ध अधिक चिघळेल, अशी चिंता जगाला लागली होती. अशा प्रचंड तणावाच्या परिस्थितीत ट्रम्प यांनी आज थेट युद्धविरामाची घोषणा केल्याने जगाने सुटकेचा निःश्वास टाकला.
अमेरिकेने पाकिस्तानचे शरीफ यांच्या मध्यस्थीने तर इराणने चीनच्या आग्रहामुळे युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला, असे सांगण्यात आले. मात्र इराणने हा प्रस्ताव स्वीकारताना ट्रम्प यांच्यासमोर दहा अटींचा प्रस्ताव ठेवला आहे. या अटी मान्य झाल्या तरच कायमस्वरुपी युद्ध बंद होईल, अशी ठाम भूमिका घेतली. आमचे सैन्य आजही लढण्यास सज्ज आहे, शत्रूने जराशी चूक केली तर त्याला ताकदीने उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला. इराणच्या या ताठर भूमिकेसमोर नमते घेत ट्रम्प यांनी इराणचा अटींचा प्रस्ताव स्वीकारला. आता या प्रस्तावावर इस्लामाबादमध्ये 10 एप्रिल रोजी इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींची एक बैठक होणार आहे. या बैठकीच्या यशापयशावर युद्धविरामाचे भवितव्य अवलंबून आहे.
होर्मुजवर इराण आणि ओमानचेच नियंत्रण राहील, युद्धामुळे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी होर्मुजमधून जाणार्या जहाजांकड़ून टोल वसूली करण्याचे इराणचे अधिकार मान्य करावेत, इराणची सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि प्रादेशिक शांततेची हमी अमेरिकेने द्यावी, युरेनियम संवर्धनाला परवानगी द्यावी, अमेरिका व इस्त्रायलच्या सैन्याने माघार घ्यावी अशा अटी इराणने ठेवल्या आहेत. यावरील चर्चेवेळी तडजोड होईल अशी आशा आहे. त्यामुळे अख्ख्या जगाचे आता या बैठकीकडे लक्ष लागले आहे. भारताने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की आम्ही याचे स्वागत करतो, यामुळे पश्चिम आशियात दीर्घकाळ शांतता प्रस्थापित होईल आणि होर्मुज मधून जहाजांची वाहतूक व व्यापार सुरू होईल.
शेअर बाजारात तेजीची लाट
सेन्सेक्स व निफ्टी वधारले
इराण-अमेरिका युद्धविरामाचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 2,946.32 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 873.70 अंकांनी उसळला. युद्धविरामाच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. प्रति पिंप 110 डॉलरच्या पुढे गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति पिंप 95 डॉलरपर्यंत घसरल्या. त्याचा फायदा शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये दिसून आला. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत रेपो रेट 5.25 वर कायम ठेवण्यात आला. त्याचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 3.78 आणि 3.95 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली. सेन्सेक्स 77,562.90 अंकांवर तर निफ्टी 23,997.35 अंकांवर स्थिरावला.










