Shubman Gill Record: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने खास विक्रमाची नोंद केली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळताना गिलने केवळ ७० धावांची स्फोटक खेळीच केली नाही, तर आयपीएल कारकिर्दीतील एक मैलाचा दगडही पार केला. शुभमन गिलने आता आयपीएलमध्ये आपल्या ५०० बाउंड्री (चौकार आणि षटकार मिळून) पूर्ण केल्या आहेत.
केवळ ११७ डावांमध्ये पराक्रम
शुभमन गिलने ५०० बाउंड्रींचा हा जादुई आकडा गाठण्यासाठी केवळ ११७ डाव घेतले. या कामगिरीसह तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ५०० बाउंड्री पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या विशेष यादीत सामील झाला आहे. सध्या त्याच्या नावावर ३८२ चौकार आणि १२४ षटकार असे एकूण ५०६ बाउंड्री नोंदवण्यात आल्या आहेत.
दिग्गजांच्या यादीत मानाचे स्थान
सर्वात जलद ५०० बाउंड्री मारण्याचा विक्रम आजही वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने अवघ्या ८७ डावांमध्ये ही किमया केली होती.
- ख्रिस गेल: ८७ डाव
- जोस बटलर: १०१ डाव
- डेव्हिड वॉर्नर: १०५ डाव
- केएल राहुल: १०५ डाव
- शुभमन गिल: ११७ डाव
या यादीत शुभमन गिल आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे, केएल राहुल नंतर ५०० बाउंड्रींचा टप्पा इतक्या वेगाने ओलांडणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
कॅप्टनची जबरदस्त कामगिरी
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात गिलने ४५ चेंडूत ७० धावा करताना ४ चौकार आणि ५ षटकार ठोकले. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्समधून आपल्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या गिलने आता गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. एका बाजूला विराट कोहली १०७५ बाउंड्रीसह या यादीत सर्वात वर असला, तरी गिल ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता तो अनेक मोठे विक्रम मोडीत काढेल असे चित्र दिसत आहे.
हे देखील वाचा – Strait of Hormuz Oil Toll: इराणची मोठी खेळी! हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर ‘कॅशलेस’ टॅक्स; प्रति बॅरल मोजावा लागणार १ डॉलर










