Original Hapus Mango: उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठांमध्ये फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या ‘हापूस’ आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, रत्नागिरी आणि देवगड हापूसला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन अनेक व्यापारी कर्नाटक किंवा इतर राज्यांतील आंब्यांची ‘हापूस’ म्हणून विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
अस्सल हापूसचा स्वाद आणि सुगंध वैशिष्ट्यपूर्ण असतो, पण फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अस्सल हापूस कसा ओळखावा?
अस्सल हापूस ओळखण्याच्या ३ मुख्य खुणा आहेत:
- पातळ साल: रत्नागिरी किंवा देवगड हापूसची साल अत्यंत पातळ असते.
- गर आणि रंग: आंबा कापल्यानंतर त्याचा गर गडद केशर (डार्क ऑरेंज) रंगाचा दिसतो.
- सुगंध: हापूसला एक नैसर्गिक आणि मनमोहक सुगंध असतो, जो इतर आंब्यांमध्ये नसतो. याउलट, इतर ठिकाणच्या आंब्याची साल जाड असते आणि त्याचा गर पिवळसर रंगाचा असतो.
नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला आंबा?
आंबा नैसर्गिकरीत्या पिकला आहे की रसायनांचा वापर करून, हे ओळखणेही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे:
- नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा: हा आंबा देठाकडून हळूहळू पिकत जातो. याची साल सर्वत्र सारख्या रंगाची नसते, त्यावर कुठे हिरवे तर कुठे पिवळे डाग दिसतात. याचा सुगंध मंद आणि नैसर्गिक असतो.
- केमिकलने पिकवलेला आंबा: इथेनॉल किंवा इतर रसायनांचा वापर केलेले आंबे बाहेरून आणि आतून पूर्णपणे एकसारख्या रंगाचे दिसतात. अशा आंब्यांचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
किमतीवर हवामानाचा परिणाम
यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी असल्याने बाजारात अस्सल हापूसचे दर तेजीत आहेत. याचाच फायदा घेत कमी दर्जाचे आंबे हापूस म्हणून विकण्याचे प्रमाण वाढले आहे.
आंबा खरेदी करताना त्याचा सुगंध, सालीचा पोत आणि रंगाची नीट पारख करा. शक्यतो विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा, जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला अस्सल चवीचा आनंद घेता येईल.
हे देखील वाचा
Monsoon 2026 Forecast: ‘अल निनो’मुळे मान्सूनचा खेळ बिघडणार? यंदा किती पाऊस होणार? अंदाज जाहीर










