Slow Heart Rate Risks: आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाचे ठोके एका विशिष्ट गतीने पडणे आवश्यक असते. सामान्यतः एका निरोगी व्यक्तीच्या हृदयाची गती मिनिटाला ६० ते १०० दरम्यान असते. परंतु, जर हे ठोके सातत्याने ६० च्या खाली जात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे जिवावर बेतू शकते. वैद्यकीय शास्त्रानुसार या स्थितीला ‘ब्रॅडीकार्डिया’ असे संबोधले जाते.
नेमकी अडचण कुठे येते?
हृदयामध्ये नैसर्गिकरित्या एक ‘पेसमेकर’ (SA Node) असतो, जो हृदयाचे ठोके आणि लय नियंत्रित करतो. जेव्हा या विद्युत यंत्रणेत बिघाड होतो किंवा ती कमकुवत होते, तेव्हा हृदयाकडून शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत नाही. याचा थेट परिणाम मेंदू आणि शारीरिक क्षमतेवर होतो. ॲथलीट किंवा गाढ झोपेत असलेल्या लोकांची हार्ट रेट कमी असणे सामान्य असले तरी, सामान्य माणसासाठी मात्र हे धोक्याचे लक्षण ठरू शकते.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
ब्रॅडीकार्डियाची लक्षणे अत्यंत साधी वाटत असल्याने अनेकदा लोक त्याकडे वयोमानानुसार येणारा थकवा म्हणून पाहतात. मात्र, खालील गोष्टी जाणवल्यास त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे:
- वारंवार चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे.
- छातीत धडधड होणे किंवा अस्वस्थ वाटणे.
- थोड्याशा कामानेही प्रचंड धाप लागणे.
- स्मृतीभ्रंश होणे किंवा कामात लक्ष न लागणे.
कोणाला आहे सर्वाधिक धोका?
वाढत्या वयानुसार हृदयाच्या स्नायूंची झीज होत असल्याने ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. याशिवाय ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित जुने आजार आहेत, अशा व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांमधील ही लक्षणे ‘म्हातारपण’ म्हणून दुर्लक्षित राहतात, ज्यामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत.
उपचार आणि उपाययोजना
हृदयाची गती मोजण्यासाठी ‘ईसीजी’ किंवा ‘होल्टर मॉनिटर’ या चाचण्यांचा वापर केला जातो. उपचाराची दिशा ही आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जर समस्या गंभीर असेल, तर हृदयाची लय पूर्ववत करण्यासाठी ‘पेसमेकर’ बसवावा लागतो. आजच्या काळात विना-शस्त्रक्रिया (किमान आक्रमक) पेसमेकर तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.










