Home / क्रीडा / IPL 2026 : MI नाही, RCB ही नाही! ‘हा’ संघ सर्वात आधी गाठणार फायनल; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी..

IPL 2026 : MI नाही, RCB ही नाही! ‘हा’ संघ सर्वात आधी गाठणार फायनल; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी..

IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, आज चाहत्यांना दोन रोमांचक...

By: Team Navakal
IPL 2026 :
Social + WhatsApp CTA

IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, आज चाहत्यांना दोन रोमांचक सामन्यांची मेजवानी अर्थात ‘डबल हेडर’ पाहायला मिळणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन बलाढ्य संघ परस्परांशी भिडतील, तर संध्याकाळच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात निकराची झुंज पाहायला मिळेल. स्पर्धेतील सर्व १० संघांनी आतापर्यंत किमान तीन सामने खेळले असल्याने, प्रत्येक संघाची रणनीती, त्यांच्यातील बलस्थाने आणि कमकुवत दुवे आता स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत.

या हंगामात काही युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या मुकुल चौधरीने गेल्या सामन्यात पराभवाच्या छायेतून संघाला बाहेर काढत विजय मिळवून दिला, तर राजस्थान रॉयल्सचा नवोदित फलंदाज वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर तुटून पडत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही गेल्या सामन्यातील अपवाद वगळता फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात यंदा अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, ही चाहत्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

राजस्थान रॉयल्सच्या जबरदस्त फॉर्मची दखल घेत श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, “यावर्षी राजस्थान रॉयल्सचा संघ निश्चितपणे अंतिम फेरीत धडक मारेल.” राजस्थानच्या कामगिरीचा आलेख पाहिला तर हे विधान अतिशय सार्थ वाटते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी सध्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध अवघ्या ११ षटकांत १५० धावा कुटल्या, तर बंगळुरूविरुद्ध २०२ धावांचे विशाल लक्ष्य १२ चेंडू राखून लीलया पार केले.

विद्यमान हंगामात राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकून गुणतालिकेत आपले वर्चस्व राखले आहे. त्यांच्याशिवाय केवळ पंजाब किंग्स हा असा एकमेव संघ आहे ज्याला अद्याप पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. पंजाबने तीनपैकी दोन सामने जिंकले असून त्यांचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिल्याच हंगामाचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली होती, परंतु गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या किताबाची प्रतीक्षा संपवण्यासाठी राजस्थानचा संघ सज्ज दिसत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या