Cheapest Bikes in India: भारतीय दुचाकी बाजारपेठेत नेहमीच अशा गाड्यांना मागणी असते ज्यांची किंमत कमी आणि मायलेज जास्त आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. GST 2.0 चे नवीन नियम लागू झाल्यामुळे अनेक लोकप्रिय बाईक्सच्या किमती आता पूर्वीपेक्षा कमी झाल्या आहेत. जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर १००००० रुपयांच्या आत उपलब्ध असलेल्या या ५ स्वस्त पर्यायांवर नक्की नजर टाका.
१. हिरो एचएफ डिलक्स आणि एचएफ १००
हिरो मोटोकॉर्पच्या या दोन्ही बाईक्स मध्यमवर्गीयांच्या पहिल्या पसंतीच्या आहेत. जीएसटीमधील बदलानंतर हिरो एचएफ डिलक्सच्या ऑल-ब्लॅक मॉडेलच्या किमतीत थेट ५,००० रुपयांची कपात झाली असून आता ही बाईक ५६,६५७ रुपये एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, ९७.२ सीसी इंजिन असलेली हिरो एचएफ १०० ही बाईक ५९,८३९ रुपये एक्स-शोरूम किमतीत मिळत असून ती टिकाऊपणासाठी ओळखली जाते.
२. टीव्हीएस स्पोर्ट इएस
किमतीच्या बाबतीत विचार केला तर टीव्हीएस स्पोर्ट इएस ही सध्या देशातील सर्वात किफायतशीर बाईक ठरली आहे. ११० सीसी इंजिन आणि फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान असलेल्या या गाडीची एक्स-शोरूम किंमत आता केवळ ५५,५०० रुपये आहे. कमी खर्चात स्टायलिश लूक आणि चांगले मायलेज हवे असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम निवड आहे.
३. बजाज प्लॅटिना १००
मायलेजचा बादशहा मानली जाणारी बजाज प्लॅटिना १०० आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. कर सुधारणेपूर्वी ६८,२६२ रुपयांना मिळणारी ही बाईक आता ६६,०१५ रुपये एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. लांबच्या प्रवासासाठी कंफर्टेबल सस्पेन्शन आणि सीट ही या गाडीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
४. होंडा शाईन १००
होंडा कंपनीची सर्वात स्वस्त बाईक म्हणून शाईन १०० कडे पाहिले जाते. ज्या ग्राहकांना इंजिनच्या गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत ६५,३९३ रुपये इतकी आहे. यात ९८.९८ सीसीचे इंजिन असून ती रायडिंगसाठी अतिशय स्मूथ आहे.
जीएसटीच्या या नवीन दरांमुळे ग्राहकांना आता आपल्या आवडीची बाईक खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. वर नमूद केलेल्या सर्व किमती एक्स-शोरूम असून, त्या शहरांनुसार बदलू शकतात.











