US Iran War: मध्यपूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’ची संपूर्ण लष्करी नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.
ट्रम्प यांचा थेट इशारा: “नरकात पाठवू”
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला कडक इशारा दिला आहे. “अमेरिकन नौदल हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व जहाजांची नाकेबंदी करेल. जर कोणत्याही इराणी सैनिकाने आमच्यावर किंवा शांततापूर्ण जहाजांवर गोळीबार केला, तर त्यांना थेट नरकात पाठवले जाईल,” अशा जहाल शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
शांतता चर्चा फिस्कटली
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी मोहम्मद बागेर घालिबाफ यांच्यात पाकिस्तानमध्ये तब्बल 21 तास प्रदीर्घ चर्चा झाली. 1979 च्या क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील ही सर्वोच्च पातळीवरील भेट होती. मात्र, अण्वस्त्र प्रसारबंदीच्या मुद्यावर इराणने तडजोड करण्यास नकार दिला. “आम्ही आमचा अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव इराणसमोर ठेवला होता, परंतु त्यांनी अटी स्वीकारल्या नाहीत,” असे व्हान्स यांनी स्पष्ट केले.
नौदलाची मोठी कारवाई सुरू
अमेरिकन नौदलाची ‘यूएसएस फ्रँक ई पीटरसन’ आणि ‘यूएसएस मायकेल मर्फी’ ही विनाशिका जहाजे 11 एप्रिल रोजीच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत दाखल झाली आहेत. इराणने या भागात पेरलेली समुद्री सुरुंगे नष्ट करण्याचे काम अमेरिकेने हाती घेतले आहे. दुसरीकडे, इराणने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला असून आपली क्षेपणास्त्रे अमेरिकन जहाजांवर रोखलेली असल्याचे म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?
इराणच्या संसदेचे अध्यक्ष घालिबाफ यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. अमेरिकेतील पेट्रोल पंपांवरील वाढत्या किमतींचा फोटो शेअर करत त्यांनी अमेरिकन जनतेला इशारा दिला आहे. “नाकेबंदीच्या नादात लवकरच तुम्हाला 4 ते 5 डॉलर लिटरने मिळणारे पेट्रोल स्वप्न वाटू लागेल,” असे त्यांनी म्हटले आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 20 टक्के व्यापार याच मार्गावरून होतो, त्यामुळे या नाकेबंदीचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो.
अमेरिका लवकरच इराणच्या बंदरांकडे जाणारी सर्व जहाजे रोखण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. या लष्करी हालचालींमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.










