Rohit Sharma-Virat Kohli : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या महामुकाबल्यात आरसीबीने यजमान मुंबईवर १८ धावांनी मात केली. या सामन्यात केवळ धावांचा पाऊस पडला नाही, तर भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज— रोहित शर्मा आणि विराट कोहली — यांच्यातील मैत्रीपूर्ण चढाओढ आणि हलक्याफुलक्या क्षणांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. जरी मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी सोशल मीडियावर रोहित आणि विराटच्या संवादाचे व्हिडिओ प्रचंड वेगाने प्रसारित होत आहेत.
मैदानावरील ‘प्रेमळ टशन’ आणि धावबादचा इशारा-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी सुरू असताना एक रंजक प्रसंग घडला. दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फिल सॉल्टने फटका खेळला आणि चेंडू थेट रोहित शर्माच्या हाती गेला. यावेळी धाव घेण्याच्या तयारीत असलेल्या विराट कोहलीला रोहितने चेंडू हातात धरून यष्ट्यांच्या (स्टंम्प्स) दिशेने रोख धरत धावबाद करण्याची मिश्किल धमकी दिली. रोहितचा हा सावध पवित्रा आणि त्यावर विराटने दिलेली दाद, यातून या दोन महान खेळाडूंमधील जिव्हाळा दिसून आला. सामन्याच्या सुरुवातीलाही विराटने फलंदाजीला येताच रोहितची भेट घेऊन काही काळ चर्चा केली होती, ज्याने चाहत्यांना भारावून टाकले.
विराटचे अर्धशतक आणि रोहितची दुखापत-
या सामन्यात विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ३८ चेंडूंत ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने २४० धावांचा विशाल डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुंबईच्या डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने १३ चेंडूंत १९ धावा केल्या, परंतु दुर्दैवाने सहाव्या षटकात स्नायू दुखावल्याने (Hamstring Injury) त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. रोहितच्या या अनपेक्षित जाण्यामुळे मुंबईच्या आक्रमकतेला सुरुवातीलाच खीळ बसली.
मुंबईचा लढा आणि मध्यम फळीची पडझड-
२४१ धावांच्या अजस्त्र लक्ष्याचा पाठलाग करताना रयान रिकेल्टनने २७ धावांची भर घातली, मात्र सुयश शर्माने एकाच षटकात रिकेल्टन आणि तिलक वर्मा यांना बाद करून मुंबईच्या आशेला मोठा धक्का दिला. आठव्या षटकात मुंबईची अवस्था २ बाद ८० अशी झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव (३३ धावा) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (४० धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार ठोकला, पण मोक्याच्या क्षणी कृणाल पांड्याने ‘सूर्या’ला बाद केल्याने मुंबईचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.









