Anjali Damania : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सध्या अशोक खरात प्रकरण अत्यंत कळीचा आणि वादग्रस्त मुद्दा ठरत आहे. या प्रकरणाची व्याप्ती इतकी अफाट आहे की, तपासाची चक्रे जसजशी फिरत आहेत, तसतशी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. एखाद्या खोल गर्तेप्रमाणे या प्रकरणाची मुळे प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेत खोलवर रुजलेली दिसून येत असून, दररोज उघड होणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच गडद होत चालले आहे. सुरुवातीला जेव्हा या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले, तेव्हा संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हे केवळ हिमनगाचे टोक असून त्यानंतर अनेक दिग्गज राजकारण्यांची नावे या प्रकरणाशी जोडली जाऊ लागल्याने सत्तेच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
या गंभीर प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, काही नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणातील संशयास्पद बाबींवर बोट ठेवले. या राजकीय संघर्षात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही बऱ्याच दिवसापासून या प्रकरणाचा पाठ पुरावा करताना दिसत आहेत, त्यांनी आपल्या सडेतोड शैलीत या प्रकरणातील आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराच्या बाजू मांडल्या आहेत.
प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतील बड्या नावांचे धाबे दणाणले; अंजली दमानियांच्या संभाव्य गौप्यस्फोटाकडे महाराष्ट्राचे लक्ष-
या भोंदूगिरीच्या चिखलात केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच नव्हे, तर समाजाचे रक्षणकर्ते आणि धोरणकर्ते समजले जाणारे प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक स्तरावरील बडे अधिकारी अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या व्याप्तीने राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
या प्रकरणाला आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भूमिकेमुळे एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. दमानिया यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाबींकडे लक्ष वेधले असून, त्या उद्या एक ‘मोठा गौप्यस्फोट’ करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. खरातला संपर्क साधणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अशा काही राजकारण्यांची नावे आहेत, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरले, असा दावा त्यांनी केला आहे. विशेषतः तपासादरम्यान समोर आलेले ‘१८२५’ हे आकडे आणि त्या क्रमांकावरून झालेले संशयास्पद संपर्क सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. हे कॉल नक्की कोणाचे होते आणि त्यामागील उद्देश काय होता, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशोक खरात याच्या माध्यमातून सत्तेच्या उच्च पदस्थ वर्तुळात कशा प्रकारे शिरकाव करण्यात आला आणि त्या बदल्यात कोणते लाभ मिळवले गेले, याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात प्रकरण: भोंदूगिरीच्या विळख्यात उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारणी; अंजली दमानियांच्या ‘त्या’ १८२५ कॉलच्या गौप्यस्फोटाकडे राज्याचे लक्ष-
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या अटकेनंतर उघडकीस येत असलेली माहिती केवळ धक्कादायक नसून, ती राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. तपासातील निष्कर्षांनुसार, खरातच्या तथाकथित ‘दरबारात’ केवळ सर्वसामान्य भक्तच नव्हे, तर राज्याच्या सत्तेच्या चाव्या हाती असलेले बडे राजकारणी आणि कायद्याचे रक्षक समजले जाणारे प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस महानिरीक्षक (IG) दर्जाचे अधिकारी नतमस्तक होत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती एखाद्या महाकाय जाळ्याप्रमाणे पसरली असून, आता यातील ‘पांढरपेशी’ चेहरे उघडे पडण्याची वेळ आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात खळबळजनक बाब म्हणजे खरातच्या संपर्कात असलेले फोन कॉल्स. तपासादरम्यान १८२५ हून अधिक संशयास्पद फोन नंबरची नोंद समोर आली आहे. यामध्ये खरातला आलेले फोन आणि त्याने स्वतःहून उच्चपदस्थांशी साधलेला संपर्क अशा दोन्ही बाजूंचा समावेश आहे. या १८२५ क्रमांकांचे रहस्य उलगडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढाकार घेतला असून, त्या उद्या या संपूर्ण प्रकरणाची ‘कुंडली’ मांडणार आहेत. दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, या यादीत समाविष्ट असलेल्या राजकारण्यांची नावे जाहीर झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल. जनमानसात स्वच्छ प्रतिमा असलेल्या अनेक नेत्यांचे मुखवटे या गौप्यस्फोटामुळे गळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खरातच्या या मायाजालात प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमके कोणत्या कारणास्तव ओढले गेले, हा सध्या तपासाचा मुख्य विषय आहे. वैयक्तिक स्वार्थ, अंधश्रद्धा की काही मोठ्या भ्रष्टाचाराचे लागेबांधे यामागे दडलेले आहेत, याचा उलगडा अंजली दमानिया यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेतून होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये केवळ राजकारणीच नव्हे, तर तळागाळातील तहसीलदारांपासून ते थेट पोलीस निरीक्षकांपर्यंत अनेक जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
तपासातून समोर आलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे, अशोक खरात याने सरकारी यंत्रणेचा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अत्यंत पद्धतशीरपणे वापर करून घेतला आहे. त्याने केवळ स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपले नाहीत, तर अनेक प्रभावशाली राजकारण्यांना विविध मार्गांनी ‘मोठा फायदा’ मिळवून दिल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. खरातने या राजकारण्यांच्या मदतीने प्रशासनावर आपली पकड मजबूत केली होती की काय, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे अंजली दमानियांच्या निशाण्यावर; १८ कॉल्स आणि कार्यक्रमातील सहभागामुळे खळबळ-
याच सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल या संधर्भात एक्सवर एक पोस्ट देखील केली होती. त्यांनी थेट नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दमानिया यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून काही फोटो प्रसारित केल्या आहेत, ज्यामध्ये पोलीस महानिरीक्षक कराळे हे अशोक खरात याच्या एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याचा अशा संशयास्पद व्यक्तीसोबतचा वावर आता सार्वजनिक चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला आहे.
अंजली दमानिया यांनी या संदर्भात प्रशासनाला आणि पोलीस दलाला अत्यंत टोकदार प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, दत्ता कराळे यांच्यासारख्या जबाबदार आणि उच्च श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्याने खरातसारख्या व्यक्तीच्या व्यासपीठावर जाणे आणि तिथे भाषण देणे, हे केवळ अनाकलनीय नसून धक्कादायक आहे. जेव्हा सामान्य नागरिक अशा मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला एखाद्या ‘बाबा’ किंवा भोंदूच्या कार्यक्रमात पाहतात, तेव्हा त्यांचा अशा व्यक्तींवरील विश्वास अधिक दृढ होतो.
श्री दत्ता कराळे हे एक IG लेवल चे पोलिस अधिकारी असतांना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 13, 2026
त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे
त्यांचे देखील थोडे थोडके… pic.twitter.com/FWq0dHHpdT
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरात आणि आयजी कराळे यांच्यातील कथित संपर्क. दमानिया यांच्या दाव्यानुसार, कराळे यांचे खरातसोबत केवळ जुजबी संबंध नसून, त्यांचे तब्बल १८ कॉल रेकॉर्डवर आहेत. या पार्श्वभूमीवर, दमानिया यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
दत्ता कराळे यांच्यावरील या थेट आरोपांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, प्रशासकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. आता उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया या संदर्भात आणखी कोणते पुरावे सादर करणार आणि त्यातून कोणत्या नवीन नावांची भर पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. या प्रकरणामुळे आता केवळ राजकारणीच नव्हे, तर पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ‘अघोरी विद्ये’चा वापर! उद्याच्या दमानियांच्या गौप्यस्फोटाकडे लक्ष-
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वैचारिक संघर्षासोबतच आता ‘अंधश्रद्धा’ आणि ‘अघोरी कृत्यां’च्या आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ‘काळी जादू’ किंवा करणी-बाधा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सातत्याने केला जात आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या नेत्यांनी या संदर्भात एकमेकांकडे संशयाची सुई वळवली असून, आधुनिक विज्ञानाच्या युगात राजकारणातील हा ‘जादूटोणा’ चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला.
या गूढ प्रकरणावर आता प्रकाश टाकण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. उद्या, बुधवारी १५ एप्रिल रोजी, त्या या प्रकरणा संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा ‘गौप्यस्फोट’ करणार आहेत. अंजली दमानिया यांच्या उद्याच्या दाव्यांमध्ये नक्की कोणाची ‘कुंडली’ बाहेर येणार आणि या आरोपांचे गांभीर्य किती आहे, हे स्पष्ट होईल.









