Samrat Choudhary : बिहारच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री सत्तास्थानी विराजमान होणार आहे. दोन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले अनुभवी नेते सम्राट चौधरी आज सकाळी ११ वाजता पाटणा येथील लोकभवनात बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतील. या ऐतिहासिक निर्णयामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नितीश कुमार यांचा राजीनामा आणि राजकीय निवृत्तीचे संकेत-
जनता दल युनायटेडचे (जदयू) ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळातील शेवटची कॅबिनेट बैठक आज पार पाडली. या बैठकीनंतर त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहण्यास सांगितले आहे. दरम्यान, नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नितीश कुमार यांच्यानंतर त्यांचे पुत्र वारसदार म्हणून राजकारणात येतील, अशी आशा जदयूच्या कार्यकर्त्यांना होती, मात्र निशांत कुमार यांच्या निर्णयामुळे या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
सम्राट चौधरी यांची पक्षनेतेपदी सर्वानुमते निवड-
भाजप विधानमंडळ दलाच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपचे वरिष्ठ नेते विजय सिन्हा यांनी विधानमंडळ पक्षनेते पदासाठी सम्राट चौधरी यांचे नाव प्रस्तावित केले, ज्याला रेणू देवी, मंगल पांडेय, दिलीप जयस्वाल आणि इतर सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. राजद आणि जदयू असा राजकीय प्रवास केल्यानंतर भाजपमध्ये स्थिरावलेल्या सम्राट चौधरी यांनी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. “गेल्या दोन दशकांपासून मी राजकारणात आहे, परंतु भाजपमध्ये आल्यावरच मला खऱ्या विचारधारेची ओळख झाली. पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवराज सिंह चौहान यांनी गौरविले नितीश कुमार यांचे कार्य-
या राजकीय बदलावर भाष्य करताना भाजपचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नितीश कुमार यांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले की, “नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांत बिहारचा कायापालट केला आहे. राज्याला ‘जंगलराज’च्या छायेतून बाहेर काढून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. महिला आरक्षण, दारूबंदी आणि कृषी रोडमॅप यांसारख्या त्यांच्या धाडसी निर्णयांचा आदर्श संपूर्ण देश घेत आहे.









