Drugs party Nesco : गोरेगाव पूर्व येथील ‘नेस्को एक्झिबिशन सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ११ एप्रिल रोजी नेस्कोच्या हॉल क्रमांक ५ मध्ये हा सोहळा पार पडला होता. या प्रकरणाच्या पोलीस तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, उच्चशिक्षित तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात कशी ओढली जात आहे, याचे विदारक चित्र स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थांचा ‘ओव्हरडोज’ आणि जीवितहानी-
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मृतांसह एकूण १५ ते १६ विद्यार्थ्यांचा एक मोठा गट या कार्यक्रमाला आला होता. हे सर्व विद्यार्थी मुंबईतील चर्नी रोड परिसरातील एका वसतिगृहात (हॉस्टेल) राहून एमबीएचे (MBA) शिक्षण घेत होते. ५ ते १० जणांच्या तुकड्यांमध्ये हे विद्यार्थी कॉन्सर्टसाठी हॉलमध्ये दाखल झाले होते. या पार्टीत सहभागी झालेल्या तीन विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते. त्यापैकी दोघांचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे (ओव्हरडोज) दुर्दैवी मृत्यू झाला. यातील शीतल नावाची एक विद्यार्थिनी गंभीर असून सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींकडून अमली पदार्थांच्या सहा ते सात गोळ्या जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासात हे अमली पदार्थ मुंबईबाहेरून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
अतिप्रचंड प्रवेश शुल्क आणि आयोजकांचे संशयास्पद वर्तन-
या हाय-प्रोफाईल म्युझिक कॉन्सर्टसाठी आयोजकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून २,००० रुपये प्रवेश शुल्क आकारले होते. मात्र, इतकी मोठी रक्कम आकारूनही सुरक्षेच्या आणि नैतिकतेच्या नियमांना हरताळ फाळण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नेस्को सेंटरशी संबंधित दोन कर्मचारी, एक मुख्य आयोजक, एक विद्यार्थी आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणारा अशा सहा जणांना अटक केली आहे.
प्रशासकीय दिरंगाई आणि तपासाचे आव्हान-
एमबीएचे शिक्षण घेणारे हे होतकूरू विद्यार्थी एका रात्रीच्या मोहात कसे भरकटले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अटकेत असलेल्या आयोजकांकडे सखोल चौकशी सुरू असून, अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे कुठपर्यंत पसरलेले आहे, याचे धागेदोरे शोधले जात आहेत. नेस्को सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा या गैरप्रकारात नक्की काय सहभाग होता, हेदेखील तपासले जात आहे. या घटनेमुळे मुंबईतील रात्रीच्या पार्ट्यांमध्ये होणाऱ्या अमली पदार्थांच्या पुरवठ्यावर कडक निर्बंध आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नेस्को ड्रग्ज प्रकरण: उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह; आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या धक्कादायक ड्रग्ज पार्टीप्रकरणी तपासाची व्याप्ती आता अधिक रुंदावली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या वनराई पोलीस ठाण्याने आता प्रशासकीय परवानग्यांकडे आपले लक्ष वळवले आहे. विशेषतः, इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेल्या या म्युझिक कॉन्सर्टसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची (Excise Department) रीतसर परवानगी घेण्यात आली होती की नाही, याची कसून चौकशी आता सुरू करण्यात आली आहे.
प्रशासकीय परवानग्यांचा पेच-
नियमानुसार, अशा प्रकारच्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मद्य किंवा तत्सम पेयांचे वितरण करायचे असल्यास उत्पादन शुल्क विभागाची विशेष अनुमती आवश्यक असते. नेस्कोमधील या पार्टीत अंमली पदार्थांचा उघड वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, आयोजकांनी या नियमांचे पालन केले होते की नाही, हे तपासणे अनिवार्य झाले आहे. जर ही परवानगी घेतली नसेल, तर आयोजकांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस आता या कार्यक्रमाचे सर्व कायदेशीर दस्तऐवज आणि परवाना पत्रांची पडताळणी करत आहेत.
न्यायालयीन कारवाई आणि पोलीस कोठडी-
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेऊन सर्व आरोपींना आगामी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान, पोलीस आरोपींकडून अंमली पदार्थांचे मूळ उगमस्थान, तस्करीचे जाळे आणि यापूर्वी अशा किती पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते, याबाबत सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तपासाचा वेग आणि संभाव्य खुलासे-
वनराई पोलीस ठाण्याचे पथक अत्यंत वेगाने आणि गोपनीयतेने या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासाच्या या टप्प्यावर अनेक नवनवीन आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः, मुंबईबाहेरून आणण्यात आलेल्या ड्रग्जचा पुरवठा साखळीमध्ये (Supply Chain) आणखी किती जणांचा समावेश आहे, याचे धागेदोरे शोधले जात आहेत.
अटक झालेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे-
१. विहान उर्फ आकाश सामल – आयोजक
२. सनी जैन – व्यवस्थापक, नेस्को सेंटर
३. बालकृष्ण कुरुप – मुख्य सुरक्षा व्यवस्थापक, नेस्को
४. रौनक खंडेलवाल – ड्रग विक्रेता
५. आनंद पटेल – ड्रग्ज विक्रेता
६. प्रतीक पांडे – ड्रग्ज विक्रेता











