Mumbai Bhondubaba Ridam Panchal : विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे मूळ किती खोलवर रुजलेले आहे, याचे धक्कादायक उदाहरण मुंबईतील मालाड परिसरातून समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अघोरी पूजा आणि जादूटोणा करणाऱ्या रिदम पांचाळ नावाच्या भोंदूबाबाला दिंडोशी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन आठवड्यांच्या तपासानंतर ही कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा दर गुरुवार आणि रविवारी आपल्या राहत्या घरी व परिसरात अघोरी पूजा आयोजित करत असे. “अंगात आलेले भूत उतरवणे” किंवा “बाधा दूर करणे” या नावाखाली तो विधी करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या या विचित्र आणि भीतीदायक कृत्यांमुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत होते. वारंवार सूचना देऊनही या भोंदूबाबाने आपले प्रताप थांबवले नाहीत.
दिनांक ४ एप्रिल रोजी या प्रकरणाने टोक गाठले. पांचाळने चक्क महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांना जमवून उघडपणे जादूटोण्याचे विधी सुरू केले. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. स्थानिकांनी एकवटून याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आणि स्वाक्षरी मोहीम राबवून कठोर कारवाईची मागणी केली.
सुशिक्षित वर्गाचा अंधश्रद्धेत सहभाग-
सर्वात खेदाची बाब म्हणजे, स्वतःला प्रगत म्हणवून घेणाऱ्या मुंबईसारख्या महानगरात या भोंदूगिरीला बळी पडणाऱ्यांमध्ये सुशिक्षित लोकांचा मोठा भरणा असल्याचे दिसून आले आहे. या पूजेसाठी वापरले जाणारे अघोरी साहित्य आणि पूजेची पद्धत कोणत्याही सात्विक परंपरेत बसणारी नव्हती. तरीही अनेक लोक याला “देवीची भक्ती” मानून फसत होते. स्वतः आरोपी रिदम पांचाळने हे सर्व आरोप फेटाळून लावत ही केवळ धार्मिक पूजा असल्याचे म्हटले आहे, मात्र पोलिसांनी ‘महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.











