Bigg Boss : टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या हंगामाचा ग्रँड फिनाले आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. ‘नशिबाचे दार’ ही संकल्पना असलेल्या या हंगामात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. तब्बल १७ स्पर्धकांनी सुरू केलेल्या या प्रवासात आता केवळ पाच स्पर्धक उरले असून, यातील कोण ‘विजेतेपदाची ट्रॉफी’ उंचावणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अंतिम पाच स्पर्धक आणि चुरस-
या हंगामाच्या अंतिम फेरीत तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद या पाच दिग्गज स्पर्धकांनी स्थान मिळवले आहे. तन्वी कोलते हिने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून आपले स्थान आधीच निश्चित केले होते, त्यामुळे तिची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. मात्र, राकेश बापट यांचा संयमी खेळ आणि विशाल कोटियन यांची रणनीती यामुळे अंतिम निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या मतांच्या आधारावर उद्या या स्पर्धेचा निकाल स्पष्ट होईल.
माजी स्पर्धकांचा ‘झापूक-झूपूक’ कल्ला-
महाअंतिम सोहळ्यापूर्वी घरातील वातावरण अधिक उत्साही करण्यासाठी बिग बॉसच्या मागील हंगामातील लोकप्रिय स्पर्धकांनी घरात विशेष हजेरी लावली. यामध्ये पाचव्या हंगामाचा विजेता सुरज चव्हाण याने आपल्या खास ‘झापूक-झूपूक’ शैलीत प्रवेश करून स्पर्धकांचे मनोरंजन केले. त्याच्यासोबतच ग्लॅमरस निक्की तांबोळी, अक्षय केळकर, मेघा धाडे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे आणि शिव ठाकरे यांसारख्या माजी विजेत्यांनी आणि स्पर्धकांनी घरात धम्माल-मस्ती केली. निक्की तांबोळीच्या ‘बाईईईsss काय हा प्रकार’ या सुप्रसिद्ध संवादाने आणि सुरजच्या डान्सने घरातील ताणतणाव काही काळ दूर झाल्याचे पाहायला मिळाले.
विशाल आणि सुरजची जुगलबंदी-
समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) या भागाचे प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. एका विशेष दृश्यात विशाल कोटियन हा सुरज चव्हाणच्या गाण्यावर थिरकताना दिसत असून, घरातील सर्व स्पर्धक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. माजी स्पर्धकांनी अंतिम पाच खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. या भेटीमुळे स्पर्धकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली.










