Hormuz Strait Crisis: जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांवर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून इराणच्या राजदूतांना पाचारण करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारताची राजनैतिक भूमिका
दिल्लीत परराष्ट्र सचिवांनी इराणच्या राजदूतांची भेट घेतली. या भेटीत भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दल भारताने ‘गंभीर चिंता आणि नापसंती’ व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी जहाजांवर कोणत्या अधिकाराखाली आणि कोणत्या परिस्थितीत गोळीबार करण्यात आला, याचा खुलासा भारताने मागितला आहे.
व्यापारी जहाजे आणि खलाशांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे परराष्ट्र सचिवांनी यावेळी निक्षून सांगितले.
भारतीय जहाजांना परतावे लागले मागे
मिळालेल्या माहितीनुसार, लारक बेटाजवळ गोळीबाराची घटना घडली तेव्हा किमान 2 भारतीय जहाजे तेथे होती. या तणावामुळे या जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला आणि ती मागे फिरली. दिवसाच्या सुरुवातीला केवळ एकच जहाज ही सामुद्रधुनी ओलांडण्यात यशस्वी झाले होते. सुदैवाने, या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा जहाजांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
सागरी वाहतुकीवर परिणाम
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे पाचवा हिस्सा याच मार्गावरून होतो. गेल्या काही दिवसांपासून या भागात लष्करी हालचाली वाढल्याने व्यापारी जहाजांच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. भारतीय नौवहन महासंचालनालय (DG Shipping) सध्या या भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून खलाशांच्या सुरक्षेसाठी समन्वय साधत आहे.
इराणच्या राजदूतांनी भारताची ही चिंता तेहरानमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने इराणला या महत्त्वाच्या जलमार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक लवकरात लवकर सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.











