Record Voting Appeal in Baramati ! Fadnavis Endorses Sunetra Pawar – अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची विशेष सांगता सभा आज पार पडली. या सभेला सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील मतदारांना आवाहन केले की, अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. पण काही लोकांमुळे ही निवडणूक बिनविरोध होत नाही. मात्र अजितदादांवरील तुमचे प्रेम दाखवण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. देशात रेकॉर्ड होईल इतके मतदान करून सुनेत्रा पवारांना निवडून द्या. याशिवाय अजितदादांच्या अपघाताचे सगळे सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बारामतीतील शारदा प्रांगणात झालेल्या प्रचाराच्या या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, केंद्रिय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या सभेला बारामतीकरांचीही मोठी उपस्थिती होती. सभास्थळी अजित पवार यांचे फोटो आणि मोठे फलक लावण्यात आले होते. ते पाहून कार्यकर्ते भावुक होत होते.
या सभेत अजित पवार यांच्या आठवणी जागवत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी ही निवडणूक नसून हा अजितदादांच्या स्मृतींचा यज्ञ सुरू आहे. त्यात आपली आहुती दिली नाही तर काहीतरी राहून गेले असे वाटले असते. म्हणून ती आहुती टाकण्यासाठी आणि दादांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मी इथे आलो आहे. दादांच्या पश्चात आपले दुःख बाजूला ठेवून वहिनींनी पक्षाची धुरा सांभाळली. स्वतःचे दुःख महत्त्वाचे नाही, तर जनतेचा विश्वास आणि कर्तव्य अधिक महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी हातात घेतली आहे.
इतके वर्ष सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुनेत्राताईंनी काम केले आहे. दादांना साथ देत राजकारणदेखील जवळून त्यांनी बघितले आहे. दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही सुनेत्रा पवारांमध्ये आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रीच नाही तर सक्षम नेतृत्व लाभले आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेत अजितदादांनी मोठे योगदान दिले. अजितदादांचे निघून जाणे हे केवळ कुटुंबाचे नुकसान नाही, तर हे या अखिल महाराष्ट्राचे नुकसान आहे. अजितदादांनी सुरू केलेले सगळे प्रकल्प सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण केले जातील. मला अतिशय जवळून दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
आम्ही विरोधातही काम केले. गुण ग्राहकता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सरकारी काम सर्वोत्तम दिसले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. आज मागे वळून पाहताना त्यांनी बारामतीत केलेली अनेक कामे दिसतील. बारामतीला त्यांनी सुंदर शहर बनवले. त्यांनी आणखी अनेक कामे हाती घेतली होती. ती कामे आता त्यांच्याच तडफेने, गुणग्राहकतेने वहिनींच्या नेतृत्वात पूर्ण होतील.
फडणवीस यांच्या आधी सुनेत्रा पवार यांचे भाषण झाले. त्याआधी अजित पवार यांच्यावरील वीस मिनिटांची चित्रफीत पाहून त्या भावूक झाल्या. आपल्या भाषणात सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांच्या शिवाय सभा घ्यावी लागेल असे कधी वाटले नाही. दादांनी अपार कष्ट करून ही बारामती उभी केली. आज बारामतीमधील आबाल-वृद्ध अजूनही शोकाकूल आहेत. दादा आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. मात्र अजितदादा आपल्यात नाही हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल.
बारामतीला देशात एक नंबरचा तालुका बनवणे हे अजितदादांचे स्वप्न होते. दादांनी बारामतीला राज्याचे विकासाचे मॉडेल बनवले. त्यामुळे बारामतीकरांच्या मनात अजितदादांच्यासाठी अपार श्रद्धा आहे. ही केवळ साथ नाही, तर भावनेने बांधलेली घट्ट नाळ आहे आणि हीच ताकद आहे. दादांच्या पुण्याईनेच आज मी इथे उभी आहे. फक्त उमेदवार म्हणून नाही, दादांची स्वप्न घेऊन उभी आहे. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की, माझ्या पाठीशी बारामतीकरांची ताकद आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. दुःखाला कवटाळून न बसता मी विकासकामासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून चालेन. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच पद्धतीने मी तुमची सेवा करेन.
बारामतीत दादांच्या नावाने म्युझियम बनवण्याची घोषणाही सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात केली. त्या म्हणाल्या की, दादांच्या आयुष्याचा पट या म्युझियममध्ये पाहायला मिळणार आहे. ती केवळ आठवण असणार नाही, तर तो अखंड प्रेरणास्रोत असेल.
सुनेत्रावहिनींना लागेल ती
मदत करू! सुप्रिया पवार
या सभेला खा. सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. मात्र, आपले भाषण झाल्यावर त्या निघून गेल्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, बारामती आणि पवार यांचे नाते वेगळेच आहे. बारामतीने सहा दशके पवारांना निवडून दिले आहे. आधी पवारसाहेब आणि नंतर 35 वर्षे अजितदादांनी बारामतीची सेवा केली आहे. बारामतीने कधीच पवारांची साथ सोडली नाही. हा रेकॉर्ड आताही कायम राहणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. परंतु काही उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, सुनेत्रावहिनींसाठी विक्रमी मतदान होईल यात शंका नाही. दादांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत आम्ही सुनेत्राताईंना करू. बारामतीची आन-बान-शान पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडू.
दादांच्या अपघाताविषयीच्या
सर्व शंकांचे निरसन व्हावे
अजित पवार यांच्या बारामतीत झालेल्या अपघाताबद्दल बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, तुमच्या दादांच्या मनात जशा शंका आहेत, तशाच माझ्या मनात आहेत. अपघाताविषयीच्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. अपघाताच्या चौकशीसाठी मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विनंती केली आहे. विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच माझीदेखील भावना आहे. सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील हाच संदर्भ पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील यावर भाष्य केले. ते म्हणाले की, दादांच्या अपघाताबद्दल मलाही मनातून वाटते की, यातील सत्य बाहेर आले पाहिजे. सगळे सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही.










