Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य आणि संघटनात्मक बांधणी सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अत्यंत धोरणात्मक पाऊल उचलले आहे. पक्षांतर्गत बंडाळी किंवा सत्तासंघर्षाची शक्यता ओळखून त्यांनी सर्व महत्त्वाची सूत्रे आपल्या कुटुंबाकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट ‘तिहेरी’ वाटप केले आहे. या नव्या रचनेनुसार, उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षा या नात्याने सुनेत्रा पवार स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार आहेत. राष्ट्रीय राजकारण आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची धुरा खासदार पार्थ पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर बारामती विधानसभा मतदारसंघ आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण जबाबदारी जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अजितदादांच्या जाण्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पक्षावर असलेली आपली पकड सैल होऊ नये आणि कोणताही राजकीय दगाफटका टाळता यावा, यासाठी सुनेत्रा पवारांनी हा ‘फॅमिली पॅटर्न’ राबवल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवार यांनी राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर दिल्लीत आपले वजन वाढवण्यास सुरुवात केली आहे, तर जय पवार यांनी बारामतीमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून आपली पकड घट्ट केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बारामती पोटनिवडणुकीत जय पवार यांची सक्रियता प्रकर्षाने दिसून आली, जी त्यांच्या आगामी राजकीय प्रवासाची नांदी मानली जात आहे.
दुसरीकडे, बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत जय पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा असल्याचे त्यांनी स्वतः बोलून दाखवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले असून, भविष्यात जय पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार रिंगणात उतरू शकतात, असे संकेत दिले आहेत. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता धूसर वाटत असतानाच, सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पुत्रांनी आखलेली ही रणनीती अजितदादा गटाचे अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत कळीची ठरणार आहे.











