Mukesh Choudhary : आयपीएलच्या १९ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात खेळाच्या पलीकडचा एक अत्यंत हृदयद्रावक आणि भावूक क्षण पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या आईचे, प्रेम देवी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असतानाही, त्याने संघाप्रती असलेल्या कर्तव्याला प्राधान्य देत मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुकेशच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमवरील हजारो प्रेक्षकांचे डोळे पाणावले आणि क्रिकेट वर्तुळातून त्याच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश चौधरी यांच्या मातोश्री गेल्या एका वर्षापासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे या वृत्ताला दुजोरा देत शोक व्यक्त केला. आयुष्यातील सर्वात मोठे वैयक्तिक दुःख समोर उभे असतानाही, मुकेशने माघार न घेता आपल्या संघासाठी खेळण्याचा निर्धार केला. कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही त्याच्या या समर्पणाचा आदर राखत त्याला ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये स्थान दिले.
मैदानात उतरताना मुकेश चौधरीच्या दुःखात सहभागी होत संपूर्ण चेन्नई संघाने दंडाला काळी पट्टी बांधून प्रेम देवी यांना श्रद्धांजली वाहिली. हा प्रसंग केवळ एका संघातील एकता दर्शवणारा नव्हता, तर मुकेशच्या असीम धैर्याला दिलेली ती सलामी होती. अशा कठीण मानसिक स्थितीत असतानाही मुकेशने ४ षटके गोलंदाजी केली. त्याने ३१ धावा खर्च करत मुंबईचा आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने मागील सामन्यात शतकी खेळी केली होती, त्याला अवघ्या ७ धावांवर बाद करून आपली उपयुक्तता सिद्ध केली.
चेन्नई सुपर किंग्जने मुकेशसाठी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. “काही क्षण खेळापेक्षा मोठे असतात. शब्दांत व्यक्त न करता येणारे दुःख मनात बाळगून जेव्हा तुम्ही मैदानात उतरता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने साहस दाखवता. आज मुकेश केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर आपल्या आईसाठी खेळणारा एक मुलगा म्हणून मैदानात आहे,” अशा शब्दांत संघाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.











