NESCO Concert Drug : गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे (ओव्हरडोस) दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मीरा रोड येथील ३३ वर्षीय अभिनेत्री जिया जेकब हिला अटक केली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार वळवण्यासाठी जियाच्या बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिया जेकब आणि या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची एक मोठी साखळी पोलिसांच्या हाती लागली आहे. आरोपी आयुष साहित्य याच्याशी जियाचे असलेले चॅट रेकॉर्ड्स पोलिसांनी जप्त केले आहेत. जियाच्या खात्यात आनंद पटेल याने ६४,००० रुपये, विनीत गेरलानी याने २२,५०० रुपये, शुभा अग्रवाल हिने १,६६,४०० रुपये तर खुद्द आयुष साहित्य याने १,८४,६०० रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तपासातील आणखी एक खळबळजनक बाब म्हणजे, जिया जेकब ही गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणातील मुख्य फरार ड्रग्ज सप्लायरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. हा मुख्य आरोपी सध्या परदेशात पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जियाचा वैयक्तिक खर्च देखील हा फरार आरोपीच उचलत असे. प्राथमिक माहितीनुसार, जियाला या व्यवसायातील तांत्रिक बाबींची पूर्ण कल्पना नसली, तरी तिच्या खात्यावरून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. ज्या संगीत कार्यक्रमात मृत्यूच्या घटना घडल्या, तिथेही जिया उपस्थित होती, असे समजते.
दुसरीकडे, अटकेत असलेल्या आयुष साहित्य याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईहून गोव्याला पळून जात असताना आयुषने पोलादपूरजवळ फेकून दिलेले अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यामध्ये अंदाजे ४३५ ग्रॅम वजनाच्या ९३३ गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १५.४९ लाख रुपये आहे. तपासाच्या सुरुवातीला त्याने पोलिसांना सहकार्य केले नव्हते, मात्र सखोल चौकशीनंतर त्याने अंमली पदार्थ फेकून दिल्याची कबुली दिली. मीरा-भाईंदर परिसरातून जिया जेकबला अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.











