Home / देश-विदेश / Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार! थोडक्यात बचावले! मंत्रिमंडळच ठार करण्याचा कट

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार! थोडक्यात बचावले! मंत्रिमंडळच ठार करण्याचा कट

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या हिल्टन हॉटेलमधील विशेष आयोजित डिनर कार्यक्रमात दोन गन आणि आठ...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या हिल्टन हॉटेलमधील विशेष आयोजित डिनर कार्यक्रमात दोन गन आणि आठ काडतुसे घेऊन एक हल्लेखोर शिरला. हा हल्लेखोर तिथेच ट्रम्पचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठार करणार होता. ट्रम्पचे सात स्तरांचे सुरक्षा कवच तोडून तो ट्रम्प आणि मंत्र्यांच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने सात गोळ्याही झाडल्या. सुदैवाने तो आणखी पुढे येण्यापूर्वीच रक्षकांनी त्याला जेरबंद केले आणि ट्रम्प बचावले.


या गोळीबारानंतर ट्रम्प व फर्स्ट लेडी मेलिना यांना सुरक्षा रक्षकांनी घेरले आणि तिथून ताबडतोब हलवण्यात आले. त्यांना कुठलीही इजा झाली नाही. या घटनेने जगभर खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर काही मिनिटांत ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही अशा हल्ल्यांनी डगमगत नाही हे त्यांना दाखवायचे होते. ट्रम्प म्हणाले की, हा अमेरिकेच्या संविधानावरील हल्ला आहे. सुरक्षा रक्षकांनी चांगले काम केल्याने बचावलो. पण इराणने हा हल्ला घडविला असेल असे वाटत नाही. ट्रम्प यांच्यावरील गेल्या दहा वर्षांतील  हल्ल्याचा हा नववा प्रयत्न आहे.


वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट डिनरचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी वान्स यांच्यासह स्कॉट बेसेंट, एफबीआय प्रमुख काश पटेल, सुरक्षा मंत्री पीट हेगसेथ, परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो, विटकॉफ असे त्यांचे पूर्ण मंत्रिमंडळ आणि अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय जवळजवळ 2,500 पाहुणे उपस्थित होते. बॉलरूममध्ये डिनर सुरू झाले. एक अधिकारी ट्रम्प आणि मेलोनिया यांना कागदावर लिहिलेले काहीतरी सांगत होते. तेवढ्यात गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

तो आवाज ऐकून ट्रम्प यांच्या शेजारील महिला दचकली. बॉलरूममध्ये असलेले पाहुणेही घाबरले. सुरुवातीला त्यांना काही कळले नाही. मात्र काही क्षणात हा गोळीबाराचा आवाज असल्याचे कळल्यावर एकच गोंधळ उडाला. सर्वचजण टेबलच्या खाली, खुर्च्यांमागे लपू लागले.  सुरक्षारक्षकांनी ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी वान्स यांना गराडा घालून घाईघाईने तिथून बाहेर काढले. यानंतर बॉलरूममध्ये उपस्थित असलेल्या इतरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षा रक्षकांनी हॉटेलचा ताबा घेतला. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला तो बॉलरूममध्ये येण्याच्या आत ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 1981 साली याच हिल्टन हॉटेलात रोनाल्ड रिगन यांच्यावर हल्ला झाला होता.


हॉटेलमधून सुखरूप बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली की, वॉशिंग्टनमधील आजच्या संध्याकाळी सीक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनी उत्कृष्ट काम केले. त्यांनी त्वरेने आणि धाडसाने कारवाई केली. हल्लाखोराला पकडण्यात आले आहे. मी सुचवले आहे की, हा कार्यक्रम सुरू ठेवावा. मात्र, ही संध्याकाळ नेहमीपेक्षा वेगळी असणार आहे. आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा करावा लागणार आहे.


हल्ल्याच्या सुमारे दीड तासातच ट्रम्प यांनी माध्यमांनाही संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, हा अमेरिकेच्या संविधानावर हल्ला होता. सिक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी शौर्याने काम केले. एका अधिकार्‍याला गोळी लागली. मी आत्ताच त्याच्याशी बोललो. तो सुरक्षित आहे. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. हल्लेखोराजवळ शक्तिशाली बंदूक होती. कॅलिफोर्नियात राहणार्‍या या हल्लेखोराला पकडण्यात आले. तो एकटाच होता. तो मानसिकदृष्ट्या विकृत होता. या हल्ल्याचा इराणशी संबंध नसावा. गेल्या काही वर्षांत आपल्या प्रजासत्ताकावर एका संभाव्य मारेकर्‍याने हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे हत्येचा प्रयत्न झाला होता. काही महिन्यांनी फ्लोरिडातील पाम बीच येथेही मी थोडक्यात बचावलो. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनी पुन्हा एकदा उत्तम काम केले. रिपब्लिकन, डेमोक्रॅट, अपक्ष, पुराणमतवादी, उदारमतवादी आणि पुरोगामी सर्वांनी आपल्यातील मतभेद संपुष्टात आणावे.


हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार करणार्‍याचे नाव कोल लन आहे. तो कॅलिफोर्नियातील टॉरन्सचा रहिवासी आहे. 31 वर्षांचा हा तरुण शिक्षक व व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे. त्याने कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्याने संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे. 2014 मध्ये त्याने नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मध्ये फेलो म्हणून काम केले आहे. लॉस एंजलीस येथील काऊंटीत त्याला उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कारही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तो डेमोक्रॅट पक्षाचा कार्यकर्ता आहे. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी त्याने ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढणार्‍या कमला हॅरिस यांना 25 डॉलरची देणगी दिली होती. त्यामुळे या हल्ल्याला राजकीय रंगही चढला आहे. कोलने हा हल्ला का केला, त्याचा उद्देश काय होता, कडक सुरक्षा व्यवस्था असताना एक शॉट गन, एक हॅन्ड गन, एक चाकू, जिवंत काडतूस असे सर्व घेऊन त्याने हिल्टन हॉटेलमधील कार्यक्रमात प्रवेश कसा केला, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

 
प्राथमिक तपासानुसार, कोल हा आधीपासून हिल्टन हॉटेलमध्ये उतरला होता. तो सुरक्षा नसलेल्या एका खोलीतून बॉलरूमपर्यंत आला. त्याने एका पिशवीतून हँडगन आणली होती. बॉलरूमच्या बाहेरपर्यंत पोहोचत त्याने गोळीबार केला. तेव्हा ट्रम्प यांच्यापासून तो केवळ 50 यार्डावर होता. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. सोमवारी त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

हल्ला खरा की बनाव?
या हल्ल्यापूर्वी कार्यक्रमाची माहिती देताना प्रेस सचिव कोरोलिना लेविट म्हणाल्या की, आज डिनरवेळी ट्रम्प खास भाषण करणार आहेत, ते मजेशीर बोलतील. थोडा गोळीबारही करतील. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इराणने या वक्तव्याला महत्त्व देत हा हल्ला खरा होता की सहानुभूती मिळवायला ट्रम्प यांनी हे नाटक घडवून आणले असा सवाल केला. एक सामान्य तरुण एकट्याने दोन गन, चाकू, काडतुसे घेऊन येतो, ट्रम्प यांची सात स्तरांची सुरक्षा तोडतो आणि इतक्या जवळ येऊन गोळीबार करू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसत नसल्याने हे रचलेले नाटक आहे अशीही चर्चा आहे.

वाईन बाटल्यांची चोरी
हिल्टन हॉटेलमधील गोळीबारानंतर डिनर कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना हॉटेल रिकामे करण्यास सांगण्यात आले, तेव्हा या खास डिनरसाठी विशेष आमंत्रित असलेल्या अनेक पाहुण्यांनी संधीचा फायदा उचलून महागड्या वाईनच्या बाटल्या लांबवल्या. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात पाहुणे वाईनच्या बाटल्या घेऊन पळताना दिसत आहेत.

यापूर्वीचा हल्ल्याचा प्रयत्न
18 जून 2016 – लास वेगास – पोलिसांची बंदूक हिसकावून एकाचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला.
26 जुलै 2016 – ओहिओ – डिमेसिमा नावाच्या माथेफिरूने सभेत ट्रम्पवर हल्ला केला.
5 नोव्हेंबर 2016 – रेनो, नेवाडा – ट्रम्प भाषण देत असताना एकजण बंदूक हातात घेऊन धावून आला. ट्रम्प स्टेज
सोडून गेले.
6 सप्टेंबर 2017  – मंडान, उत्तर डकोटा – फोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.
1 ऑक्टोबर 2018 – पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची
पाकिटे पाठवली.
10 ऑगस्ट 2020 – ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला सुरक्षारक्षकांनी व्हाईट हाऊसबाहेर ठार केले.
13 जुलै 2024 – बटलर, पेनसिल्वानिया – जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रूक्स नावाच्या तरुणाने ट्रम्प यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. त्यातील एक ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली.
15 सप्टेंबर 2024- पाम बिच, फ्लोरिडा येथे – ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडूपात लपला होता. सुरक्षारक्षकांनी गोळीबार करताच तो पळाला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या