Mojtaba Khamenei : इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते मोजताबा खामेनी अमेरिका-इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात मारले गेल्याची चर्चा इराणच्या मशहद शहरामध्ये झळकलेल्या एका भित्तीचित्रामुळे जगभरात सुरू झाली आहे. या भित्तीचित्रामध्ये युद्धात मरण पावलेल्या शहिदांची छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामध्ये मोजताबा यांच्याही छायाचित्राचा समावेश आहे. इराणने अधिकृतपणे याबद्दल काही माहिती दिलेली नाही.
इराण विरूद्ध इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध छेडल्यानंतर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी मारले गेले. त्यांच्या पश्चात मोजताबा खामेनी यांना नवे सर्वोच्च धार्मिक नेते नियुक्त करण्यात आले. मात्र, आयातुल्ला खोमेनींवर झालेल्या हल्ल्यात मोजताबासुध्दा गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात होते. इराणने मोजताबा यांच्या प्रकृतीबाबत आतापर्यंत अधिकृतपणे कुठलीही माहिती दिलेली नाही. काही वृत्तपत्रांनी मोजताबा यांच्या चेहर्यावर गंभीर जखम झाल्याचा दावा केला होता. तर त्यांच्या मेंदूला मार लागल्याने ते कोमामध्ये गेल्याचेही म्हटले जात होते.
मोजताबा यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या प्रसिद्ध असताना इराणने त्यांच्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली. त्यामुळे त्यांचे नेमके काय झाले, हे रहस्यच बनले होते. परंतु मशहद शहरात मोजताबा यांचे छायाचित्र शहिदांच्या छायाचित्रांसोबत लावण्यात आले आहे.
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये भित्तीचित्रात मोजताबा यांचा फोटो स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या व्हिडिओबद्दल किंवा मशहद शहरातील भित्तीचित्राबद्दल इराण सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.










