Rihanna at Antilia: आंतरराष्ट्रीय पॉप स्टार आणि प्रसिद्ध व्यावसायिक महिला रिहाना सध्या आपल्या ‘फेन्टी ब्युटी’ या कॉस्मेटिक्स ब्रँडच्या लाँचसाठी भारत दौऱ्यावर आहे. या निमित्ताने तिने मुंबईतील प्रसिद्ध ‘अँटिलिया’ या अंबानींच्या निवासस्थानी भेट दिली.
या भेटीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, रिहानाने अंबानी कुटुंबासोबत घालवलेला वेळ चर्चेचा विषय ठरत आहे.
पारंपारिक स्वागत आणि फुलांची होळी
रिहाना आणि तिच्या टीमचे अँटिलियामध्ये ईशा अंबानी, श्लोका मेहता, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी जंगी स्वागत केले. एका व्हायरल क्लिपमध्ये रिहानाच्या स्वागतासाठी खास पारंपारिक नृत्याचे आयोजन केल्याचे दिसत आहे. या भेटीदरम्यान रिहानाने केवळ औपचारिक भेटच घेतली नाही, तर ती अंबानी कुटुंबाच्या पूजेतही सहभागी झाली. तिने आरती केली आणि ‘फुलांच्या होळी’चा आनंद लुटला.
यावेळी रिहाना अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत फुलांच्या पाकळ्यांशी खेळताना आणि डान्स करताना दिसली. पूजेनंतर तिने कुटुंबासोबत खास भोजनाचा आस्वादही घेतला.
‘फेन्टी ब्युटी की हवेली’ आणि सेलिब्रिटींसोबतची पार्टी
रिहानाच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश तिच्या सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडचे स्टोअर लाँच करणे हा होता. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला ‘फेन्टी ब्युटी की हवेली’ असे नाव देण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये रिहानाने अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांशी संवाद साधला.
याव्यतिरिक्त, तिने जान्हवी कपूर आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत एका पार्टीतही हजेरी लावली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रिहाना हिंदीत ‘थँक यू’ कसे म्हणायचे, हे विचारताना दिसत आहे, ज्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
रिहानाबद्दल थोडक्यात
बार्बाडोसमध्ये जन्मलेली रॉबिन रिहाना फेंटी ही केवळ गायिका नसून ती जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार आहे. 2005 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रिहानाने आतापर्यंत 9 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. ‘फेन्टी ब्युटी’ आणि ‘सॅव्हेज एक्स फेंटी’ यांसारख्या ब्रँड्सच्या माध्यमातून तिने अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य उभे केले आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, रिहाना आणि रॅपर एसेप रॅाकी यांना तीन मुले आहेत, ज्यामध्ये 2026 च्या सुरुवातीला जन्मलेल्या ‘रॉकी’ नावाच्या लेकीचा समावेश आहे. यापूर्वी 2024 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठीही रिहाना भारतात आली होती.
हे देखील वाचा –










