Bacchu Kadu And Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकूण १० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शक्तिप्रदर्शन होणार असले, तरी सत्ताधारी शिवसेनेमध्ये (शिंदे गट) उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. विशेषतः माजी मंत्री बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेत नव्या चेहऱ्यांची मागणी आणि अंतर्गत विरोध-
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, शिवसेनेतील अनेक मंत्री आणि आमदारांनी या नावांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेच्या धर्तीवर विधान परिषदेतही जुन्याच नेत्यांना संधी न देता नव्या दमाच्या चेहऱ्यांना वाव द्यावा, असा सूर पक्षात उमटत आहे. नीलम गोऱ्हे यांच्या नावावर मंत्र्यांचा विरोध असतानाच, बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध काय?” असा थेट प्रश्न पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडू यांच्यासमोर विलिनीकरणाचा प्रस्ताव-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या बदल्यात एक अत्यंत कठीण अट घातली आहे. बच्चू कडू यांनी १९९९ मध्ये स्थापन केलेली आपली ‘प्रहार जनशक्ती संघटना’ पूर्णपणे शिवसेनेमध्ये विलीन करावी, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यावेळी या प्रस्तावावर चर्चा झाल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी बच्चू कडू खंबीरपणे सोबत होते, मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे आता कडू ही अट मान्य करून विधान परिषदेची ऑफर स्वीकारतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचे गणित आणि मतांचा कोटा-
या निवडणुकीत विधान परिषदेच्या १० जागांसाठी दोन स्वतंत्र मतदान प्रक्रिया पार पडतील. ९ जागांसाठी नियमित निवडणूक होईल, तर काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेतली जाईल. ९ जागांच्या निवडणुकीसाठी विजयाचा कोटा २९ मतांचा निश्चित करण्यात आला आहे, तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराला ५१ टक्के मतांची आवश्यकता असेल. सध्याच्या राजकीय समीकरणानुसार, महायुती १० पैकी ९ जागा सहजपणे जिंकण्याची चिन्हे असून महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक वेळापत्रक आणि रिक्त होणाऱ्या जागा-
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, १२ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे.










