KKR vs LSG : आयपीएल २०२६ च्या हंगामातील सर्वात अटीतटीचा आणि श्वास रोखायला लावणारा सामना काल २६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला. पूर्ण निर्धारित षटकांमध्ये बरोबरीत सुटलेला हा सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये पोहोचला, जिथे कोलकात्याने बाजी मारत दोन महत्त्वपूर्ण गुण संपादन केले. या विजयामुळे कोलकात्याने गुणतालिकेत तळाचे स्थान सोडून आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
निर्धारित २० षटकांचा थरार: शेवटच्या चेंडूवर षटकार आणि बरोबरी
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. कोलकात्याच्या वतीने रिंकू सिंगने धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली, ज्याच्या जोरावर कोलकात्याने २० षटकांत ७ बाद १५५ धावांचे माफक आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात लखनऊच्या संघानेही चिवट झुंज दिली. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची गरज असताना, मोहम्मद शमीने कार्तिक त्यागीच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून धावसंख्या १५५ वर नेऊन ठेवली. यामुळे आयपीएल २०२६ मधील पहिल्या ‘सुपर ओव्हर’चा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला.
सुपर ओव्हर: सुनील नारायणची अभेद्य गोलंदाजी
सुपर ओव्हरमध्ये लखनऊकडून निकोलस पूरन आणि एडन मार्कराम हे स्फोटक फलंदाज मैदानात उतरले. कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने चेंडू अनुभवी सुनील नारायणच्या हाती सोपवला. नारायणने आपल्या फिरकीची जादू दाखवत पहिल्याच चेंडूवर पूरनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने एक धाव काढून एडन मार्करामला स्ट्राईक दिली. मात्र, तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात मार्करामने रिंकू सिंगच्या हातात झेल दिला. नारायणच्या अचूक माऱ्यामुळे लखनऊचा संघ सुपर ओव्हरमध्ये केवळ १ धाव करू शकला आणि कोलकात्यासमोर विजयासाठी अवघ्या २ धावांचे लक्ष्य राहिले.
रिंकू सिंगचा ‘फिनिशिंग’ टच
दोन धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज मैदानात आले. लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने चेंडू प्रिन्स यादवकडे सोपवला. मात्र, विजयाचे लक्ष्य अत्यल्प असल्याने फलंदाजांवर कोणताही दबाव नव्हता. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर प्रेक्षणीय चौकार मारून कोलकात्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अवघ्या एका चेंडूत कोलकात्याने विजयश्री खेचून आणली.
गुणतालिकेत कोलकात्याची सुधारणा
या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. सलग पराभवाच्या छायेत असलेल्या या संघाने आता आठव्या स्थानी झेप घेत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.











