Angkrish Raghuvanshi : २६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात झालेला सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय सामन्यांपैकी एक ठरला. उभय संघांमधील हा अटीतटीचा सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत खेचला गेला, ज्यात अखेर कोलकात्याने विजय मिळवला. मात्र, या विजयापेक्षा कोलकात्याचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याच्या बाद होण्यावरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर मैदानात झालेला राडा सध्या अधिक चर्चेत आहे.
अंगक्रिश रघुवंशीच्या विकेटचा पेच: नेमकं काय घडलं?
कोलकात्याच्या डावादरम्यान अंगक्रिश रघुवंशीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या कॅमरून ग्रीनने त्याला माघारी धाडले. क्रिझमध्ये परतण्याच्या घाईत रघुवंशीने सूर (Diving) मारली. त्याच वेळी लखनऊचा गोलंदाज मोहम्मद शमीने यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला, जो थेट रघुवंशीच्या अंगाला लागला. यावर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी ‘अब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ (क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे) या नियमानुसार पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी सखोल तपासणीनंतर रघुवंशीला बाद घोषित केले, ज्यामुळे मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मैदानावरील राडा आणि प्रशिक्षकांचा संताप-
पंचांच्या या निर्णयामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आणि समर्थक कमालीचे नाराज झाले. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर स्वतः मैदानाच्या सीमारेषेवर आले आणि त्यांची पंचांशी शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने आपल्या बॅटने बाउंड्री कुशनवर प्रहार केला आणि रागाच्या भरात आपले हेल्मेट डगआउटच्या दिशेने भिरकावले. त्याच्या या आक्रमक कृत्यामुळे आयपीएलच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
आयपीएल प्रशासनाकडून कठोर दंडात्मक कारवाई-
रघुवंशीचे हे वर्तन आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले आहे. आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, रघुवंशीवर ‘लेव्हल-१’ अंतर्गत दोषी ठरवत त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड आकारण्यात आला आहे. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट नोंदवण्यात आला आहे. त्याने आचारसंहितेतील कलम २.२ चा भंग केला असून, जे मैदानावरील उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित आहे. रघुवंशीने आपली चूक मान्य केली असून सामनाधिकाऱ्यांचा (मॅच रेफरी) निर्णय स्वीकारला आहे.
संघाच्या प्रतिमेला धक्का आणि भविष्यातील धडा-
जरी कोलकात्याने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकून दोन गुण मिळवले असले, तरी रघुवंशीच्या वर्तनामुळे या विजयावर गालबोट लागले आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, अशा प्रतिभावान युवा खेळाडूकडून संयमाची अपेक्षा असते.











