Riyan Parag Video: आयपीएल 2026 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग एका मोठ्या संकटात सापडला आहे. २८ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ‘वेपिंग’ (ई-सिगारेट ओढणे) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या प्रकारामुळे क्रिकेट चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, परागवर शिस्तभंगाच्या कारवाईसोबतच कायदेशीर कारवाईची शक्यताही वर्तवली जात आहे.
Riyan Parag Video: मैदानावरील फ्लॉप शो आणि ड्रेसिंग रूममधील वाद
रियान परागसाठी हा हंगाम बॅटने खूपच खराब ठरला आहे. ९ सामन्यांत त्याने केवळ 117 धावा केल्या आहेत. मात्र, आता त्याच्या खराब फॉर्मपेक्षा या नवीन वादामुळे त्याची चर्चा जास्त होत आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct), खेळाडूने खेळाची प्रतिमा मलीन होईल असे कोणतेही कृत्य केल्यास सामना अधिकारी त्याला दंड किंवा निलंबित करू शकतात. ड्रेसिंग रूम हे धुम्रपान विरहित क्षेत्र असल्याने बीसीसीआयच्या नियमांचेही येथे उल्लंघन झाले आहे.
कायदेशीर पेच: थेट तुरुंगवासाची शक्यता?
रियान पराग समोरील अडचणी केवळ क्रिकेटपुरत्या मर्यादित नाहीत. भारत सरकारने 2019 मध्ये ई-सिगारेट प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PECA) ई-सिगारेटच्या वापरावर आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
- पहिला गुन्हा: या कायद्यानुसार, पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- दुसरा गुन्हा: वारंवार गुन्हा केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. केवळ वैयक्तिक वापरासाठी ई-सिगारेट जवळ बाळगणे देखील कायद्याचे उल्लंघन मानले जाते.
Riyan Parag Smoking VAPE in dressing room 🤯 pic.twitter.com/EbIMI5qHxK
— Liam Livingstone (@NightmareOP9) April 28, 2026
Riyan Parag Video: सोशल मीडियावर टीकेची झोड
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रियान परागला चांगलेच धारेवर धरले आहे. एका युजरने म्हटले की, “त्याचा १५ वर्षांचा सहकारी खेळाडू याच्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे, कर्णधार असूनही याला नियमांचे भान नाही.”
तर दुसऱ्या एका युजरने उपरोधिक टोला लगावत म्हटले की, “राजस्थान रॉयल्सची या हंगामातील एकमेव अडचण रियान पराग होती, आता ती लवकरच सुटेल असे वाटते.”
युवा खेळाडू म्हणून लाखो चाहते ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात, अशा खेळाडूने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याचे मत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासन यावर काय अधिकृत निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा –
Fuel Price Update: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण











