Mumbai Pune Missing Link : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांना अधिक वेगाने जोडणाऱ्या ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील’ (Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना असलेला ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प आजपासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेत दाखल झाला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. हा मार्ग पूर्णपणे ‘ऍक्सेस कंट्रोल’ (Access Control) म्हणजेच नियंत्रित प्रवेशाचा करण्यात आला असून, यामुळे घाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
अभियांत्रिकीचे जागतिक विक्रम आणि तांत्रिक वैशिष्ट्ये-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर (खोपोली) एक्झिट ते कुसगाव या अत्यंत अवघड घाटाच्या भागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. एकूण १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच असलेला अत्याधुनिक ‘केबल-स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे.
The Missing Link is now Maharashtra’s New Connecting Link 🛣️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2026
A drive through the Mumbai–Pune ‘Connecting Link', accelerating Maharashtra towards a new QUANTUM CORRIDOR…@mieknathshinde @SunetraA_Pawar #Maharashtra #MissingLinkProject pic.twitter.com/gIr2Gb0jAp
जगातील सर्वात रुंद बोगदा: या प्रकल्पातील बोगद्याची रुंदी चक्क २३.७५ मीटर इतकी आहे. या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे या बोगद्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे.
लोणावळा तलावाखालून प्रवास: हा मार्ग लोणावळा तलावाच्या चक्क १८० मीटर (सुमारे १००० फूट) खालून जातो. हा भुयारी मार्ग तयार करणे अत्यंत आव्हानात्मक होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आहे.
दोन भव्य बोगदे: या प्रकल्पात खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही बाजूंनी ४ मार्गिकांचे (४+४ लेन) दोन बोगदे आहेत. यातील पहिला बोगदा ८.९२ किलोमीटर आणि दुसरा बोगदा १.७५ किलोमीटर लांबीचा आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार, टोलमध्ये वाढ नाही-
या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमधील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडी टाळता येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासातील तब्बल अर्धा तास (३० मिनिटे) वाचणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतरही वाहनधारकांकडून कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त टोल वसूल केला जाणार नाही, म्हणजेच जुन्याच दरात हा प्रवास करता येईल, असे उद्घाटन प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
वेगमर्यादा आणि वाहतुकीचे नियम-
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन या मिसिंग लिंक मार्गावर वाहनांच्या वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हलकी वाहने (चारचाकी): ताशी १०० किलोमीटर.
प्रवासी वाहने (बसेस): ताशी ८० किलोमीटर.
या वाहनांना बंदी: मिसिंग लिंकवर सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. ज्वलनशील पदार्थ, स्फोटक द्रव्ये किंवा घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना या मार्गावर पूर्णपणे बंदी असेल. अशा वाहनांना जुन्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरूनच प्रवास करावा लागेल.
महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पूर्ण-
सन २०१९ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प कठीण भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस आणि ताशी ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अशा अत्यंत प्रतिकूल हवामानात पूर्ण करण्यात आला आहे. आजच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली असून, जलद वाहतुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे.











