Pune Bhor Crime news : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी घटना समोर आली आहे. नसरापूर परिसरामध्ये अवघ्या चार वर्षांच्या एका निरागस चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण नसरापूर आणि भोर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले, तरी या घटनेवरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
घटनेचा सविस्तर थरार आणि पार्श्वभूमी-
पीडित चार वर्षांची चिमुरडी ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. मात्र, येथील एका नराधमाने तिला फूस लावून जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ हालचाल करत संशयित व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असले, तरी त्याने आपण असे कृत्य केले नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.
रास्ता रोको आंदोलन आणि ग्रामस्थांचा रोष-
या अमानवी घटनेनंतर शुक्रवारी रात्री नसरापूर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतापलेल्या ग्रामस्थांनी पीडित मुलीचा मृतदेह थेट पोलीस ठाण्याबाहेर आणून ठेवला आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केले. “या विकृत नराधमाला आमच्या ताब्यात द्या,” अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (एसपी) संदीप सिंग गिल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अखेर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
राजकीय पडसाद: सुषमा अंधारे यांची गृहखात्यावर जोरदार टीका-
या अत्यंत गंभीर घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. “भोर परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या होणे हा प्रकार अत्यंत राक्षसी आहे; याचा निषेध करायलाही शब्द अपुरे पडतात. आज राज्यात माणूसपण शिल्लक राहिले आहे की नाही, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “अशा घटना घडत असताना आपण गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा ठेवावी? सध्या सत्तेत बसलेला प्रत्येक जण स्वतःची जाहिरात करण्यात आणि स्वतःची शक्ती दाखवण्यात मश्गूल आहे. परंतु, राज्यातील सर्वसामान्य माणसाचे जगणे किती असुरक्षित झाले आहे, याचे भान कोणालाही नाही. राज्यात चार वर्षांची बालिकाही सुरक्षित नाही. अशा वेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्यांना या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. ‘आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ’ अशा प्रकारची मोठी भाषणे करण्यापलीकडे गृहमंत्री काहीही करणार नाहीत.










