Home / देश-विदेश / Gas : निवडणूक संपली ! तीन दिवसांत गॅस दराचा भडका! व्यावसायिक सिलिंडर 993 रूपयांनी महागले

Gas : निवडणूक संपली ! तीन दिवसांत गॅस दराचा भडका! व्यावसायिक सिलिंडर 993 रूपयांनी महागले

Gas : पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आणि तीन दिवस उलटत नाहीत तोच केंद्र सरकारने...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Gas : पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आणि तीन दिवस उलटत नाहीत तोच केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलोचा सिलिंडर 993 रुपयांनी महागला. म्हणजे आता हा सिलिंडर 3 हजार रूपयांपेक्षा जास्त महाग झाला आहे. पाच किलोचा एलपीजी सिंलिंडरही 261 रुपयांनी महाग झाला आहे. आधीच सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात ही भाववाढ झाल्याने गिर्‍हाईक आणखी कमी होण्याचा धोका आहे.


तूर्त 14 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तेवढीच ठेवली आहे. पण काही काळात ही किंमतही वाढवली जाईल .  सध्या व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि  खाणावळींचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. हा व्यवसाय करणार्‍यांचे गिर्‍हाईक कमी होऊन त्यांनाही झळ बसणार आहे. हे निवडणुकीचे बिल आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.


आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज कच्च्या तेलाचे दर 112 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते.  काल ते 126 डॉलर प्रति बॅरल होते. 2022 पासूनचा हा उच्चांक आहे.  त्यामुळे जागतिक पातळीवरील गॅसचे भावही गेले काही दिवस भडकत आहेत. त्यात आखाती युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस खास करून व्यावसायिक गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या दरात तब्बल 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर 1692 होता. मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे 144 आणि 200 रुपयांची वाढ झाली होती. मात्र भारतात पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या आणि सरकारने विरोधात मतदान होईल या भीतीने गॅस दरवाढ मतदान होईपर्यंत रोखून धरली होती. 29 एप्रिलला सर्व राज्यांचे मतदान पार पडताच सरकारने आज गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार  मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3,024 रुपयांवर गेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,078 रुपयांवरून वाढून 3,071 रुपये झाली. कोलकाता येथे सर्वाधिक वाढ झाली असून दर 2,208 रुपयांवरून दर थेट 3,202 रुपयांवर पोहोचला आहे. तर चेन्नई येथे सिलिंडरचा दर सुमारे 3,237 रुपये झाला. तर 5 किलोच्या एलपीजी सिंलिंडरची किंमत 261 रुपयांनी वाढल्याने तो 549 रुपयांवरून 810 रुपयांवर पोहोचला आहे. हा सिलिंडर छोटे हॉटेलवाले, हातगाड्यांवर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारे वापरतात.  या दरवाढीमुळे आधीच महागाईचा सामना करणार्‍या व्यावसायिकांवर दुहेरी आर्थिक ताण येणार आहे. गॅस सिलिंडरचा खर्च वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसचे  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकीनंतर महागाई वाढेल, असा इशारा मी आधीच दिला होता. व्यावसायिक सिलिंडरची किंमत एकाच दिवसात 993 रुपयांनी वाढली आहे. हे ‘निवडणूक बिल’ आहे. फेब्रुवारीपासून आतापर्यंत व्यावसायिक एलपीजीच्या किमती 1,380 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांत जवळपास 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  एलपीजीच्या किमती वाढल्याने याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांवर होईल. चहा विक्रेते, ढाबा, हॉटेल, बेकरी आणि मिठाई प्रत्येकावरील ओझे वाढेल. दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या थाळीपर्यंत त्याची झळ बसेल. कारण पदार्थांच्या किमती वाढू शकतात. ही फक्त सुरुवात आहे. पहिला हल्ला गॅसवर केला आहे. आता पुढील हल्ला हा पेट्रोल-डिझेलवर होऊ शकतो.


विशेष म्हणजे, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट  करून निवडणुका संपल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार वेळ न दवडता एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करेल, असे म्हटले होते.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या