Heinrich Klaasen : आजच्या युगात अल्प कमाईतही त्याचा मोठा दिखावा करणाऱ्या लोकांची संख्या जगात कमी नाही. त्यातच जर व्यक्ती मनोरंजन विश्व किंवा क्रिकेट क्षेत्रातील असेल, तर त्यांच्या आलिशान जीवनशैलीचा (Luxury Lifestyle) अनेकांना हेवा वाटतो. परंतु, कोट्यवधी रुपयांची कमाई असूनही कमालीचा साधेपणा जपणारे काही मोजकेच खेळाडू असतात. असाच साधेपणा दाखवणारा दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचा प्रमुख खेळाडू हेनरिक क्लासेन याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
सव्वापाच कोटींचा खेळाडू लेकीसह रिक्षात
आयपीएल २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सव्वापाच कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात कायम ठेवले आहे. जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या क्लासेनचा एक व्हिडिओ सध्या चाहत्यांची मने जिंकत आहे. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्लासेन भर उन्हात आपल्या लहान मुलीसह चक्क रिक्षाने प्रवास करताना दिसला. एका सामान्य नागरिकाप्रमाणे त्याने केलेला हा प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून, क्लासेनच्या साधेपणाचे प्रचंड कौतुक केले जात आहे.
क्लासेनचा स्फोटक फॉर्म; मुंबईविरुद्ध हैदराबादचा दणदणीत विजय
मैदानाबाहेर अत्यंत शांत आणि साधा राहणारा क्लासेन मैदानावर मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत आहे. आयपीएल २०२६ च्या ताज्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४४ धावांचे अवाढव्य लक्ष्य अत्यंत सहजपणे गाठले. हैदराबादने अवघ्या आठ चेंडू आणि सहा गडी राखून हा विजय मिळवला. या हंगामातील हैदराबादचा हा सलग पाचवा विजय असून, संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
सलामीवीरांची फटकेबाजी: ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १९ चेंडूंत ४८ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने १७ चेंडूंत ३६ धावा फटकावून पॉवरप्लेमध्ये ९२ धावांची झंझावाती भागीदारी केली.
क्लासेनची मॅचविनिंग खेळी: अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर क्लासेनने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने ३० चेंडूंत ७ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ६५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
सलग चौथे वर्ष: चालू हंगामात क्लासेनने ९ सामन्यांत ५९.१४ च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये हैदराबादसाठी सलग चार हंगामात ४०० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आहे.
वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मारलेल्या चार षटकारांच्या जोरावर हेनरिक क्लासेनने भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा आयपीएलमधील षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.
वीरेंद्र सेहवागने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १०४ डावांमध्ये एकूण १०६ षटकार मारले होते. क्लासेनने आतापर्यंत अवघ्या ५८ सामन्यांच्या ५४ डावांमध्ये १०७ षटकार मारून सेहवागला मागे टाकले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक षटकारांचा टप्पा पार
केवळ आयपीएलच नव्हे, तर जागतिक टी-२० क्रिकेटमध्येही क्लासेनने एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने आतापर्यंत एकूण २५८ सामन्यांच्या २६२ डावांमध्ये तब्बल ३५९ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीत त्याने इंग्लंडच्या फिल सॉल्टला मागे टाकले आहे. फिल सॉल्टने ३३८ सामन्यांत ३५८ षटकार मारले आहेत. सॉल्ट सध्या आरसीबी (RCB) कडून खेळत असून गेल्या काही सामन्यांपासून तो संघाबाहेर आहे. आगामी सामन्यांमध्ये पुनरागमन करून सॉल्टला क्लासेनचा हा विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध असेल. मात्र, सध्या तरी क्लासेन आपल्या कामगिरीने आणि साधेपणाने चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.











