Indian Artefacts in UK: ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कचे महापौर झोहरान मम्दानी यांनी कोहिनूर हिरा भारताला परत करण्याची मागणी केली. या मागणीमुळे पुन्हा एकदा त्या सर्व ऐतिहासिक कलाकृतींकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे, ज्या ब्रिटीश राजवटीत भारतातून नेल्या गेल्या होत्या. कोहिनूर व्यतिरिक्त अशा अनेक वस्तू आहेत ज्या आजही ब्रिटनच्या संग्रहालयांची शोभा वाढवत आहेत.
१. सुलतानगंज बुद्ध मूर्ती
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात १८६२ मध्ये रेल्वेच्या कामादरम्यान ही मूर्ती सापडली होती. ७.५ फूट उंच असलेली ही मूर्ती गुप्त-पाल काळातील (इ.स. ५००-७००) आहे. सुमारे ५०० किलो वजनाची ही तांब्याची मूर्ती १८६४ मध्ये बर्मिंगहॅमच्या संग्रहालयात नेण्यात आली. ही आशियाबाहेर असलेली सर्वात मोठी धातूची भारतीय मूर्ती मानली जाते.
२. अमरावती स्तूपाचे अवशेष
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील हा प्रसिद्ध बौद्ध स्तूप इ.स. पूर्व ३ व्या शतकातील आहे. ब्रिटीश अधिकारी कॉलिन मॅकेन्झी यांनी याचे उत्खनन केले होते. पुढे १८५९ मध्ये सुरक्षेचे कारण देऊन या स्तूपाचे मौल्यवान नक्षीकाम केलेले पाषाण लंडनला पाठवण्यात आले. सध्या हे अवशेष ब्रिटीश म्युझियममध्ये आहेत.
३. महाराजा रणजित सिंह यांचे सिंहासन
शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांच्यासाठी १८२० मध्ये सोन्याने मढवलेले हे भव्य सिंहासन बनवण्यात आले होते. १८४९ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब खालसा केला, तेव्हा त्यांनी हे सिंहासन ‘राज्याची मालमत्ता’ म्हणून ताब्यात घेतले. सध्या हे लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहे.
४. टिपू सुलतानचा वाघ (Tipu’s Tiger)
म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानचा हा एक यांत्रिक खेळण्यासारखा वाघ आहे. यामध्ये एक वाघ ब्रिटीश सैनिकाला फाडून खात असल्याचे दाखवले आहे. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणमच्या वेढ्यात टिपूचा पराभव केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने हा वाघ लुटून नेला.
५. भोजशाळेतील वाग्देवीची मूर्ती
मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा संकुलातील ही पांढऱ्या पाषाणातील मूर्ती ११ व्या शतकातील आहे. १८८० च्या सुमारास ही मूर्ती ब्रिटीश म्युझियममध्ये नेण्यात आली. ही मूर्ती देवी सरस्वतीची असल्याचे भारतीय दाव्यांमध्ये म्हटले जाते, तर ब्रिटीश म्युझियम ती जैन देवता अंबिकेची असल्याचे सांगते.
भारताचा हा मौल्यवान वारसा परत मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांत राजनैतिक स्तरावर प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत.
हे देखील वाचा –











