Real Life Iron Man: मार्व्हलचा ‘आयर्न मॅन’ कोणाला माहिती नाही? टोनी स्टार्कने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बनवलेला तो हाय-टेक सूट आता केवळ पडद्यापुरता मर्यादित राहिला नाही. एका रशियन इंजिनिअरने हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. ॲलेक्स बुर्कन असे या जिद्दी इंजिनिअरचे नाव असून, त्याने आयर्न मॅनच्या सूटला ऊर्जा देण्यासाठी एक खास ‘हायड्रोजन रिअॅक्टर’ तयार केला आहे.
टोनी स्टार्कसारखाच प्रवास
ॲलेक्सचा हा प्रवास अगदी चित्रपटातील टोनी स्टार्कच्या सुरुवातीच्या दिवसांसारखाच आहे. 2018 मध्ये त्याने साध्या पेन्सिल स्केचेस आणि मातीच्या मॉडेलपासून कामाला सुरुवात केली होती. आज अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर, त्याने एका प्रगत इंजिनिअरिंग प्रकल्पाचे रूप धारण केले आहे. मागील काही मॉडेल्समध्ये ऊर्जा कमी पडत असल्याने, आता त्याने नवीन हायड्रोजन रिअॅक्टरची ब्लुप्रिंट सादर केली आहे.
पाण्यापासून मिळणार रॉकेट इंधन
या रिअॅक्टरचे वैशिष्ट्य सांगताना ॲलेक्स म्हणाला की, “हा रिअॅक्टर म्हणजे एक प्रकारचे इलेक्ट्रोलायझर आहे. विजेच्या प्रवाहाचा वापर करून हे यंत्र पाण्याचे विघटन करते आणि त्यातून हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळे करते. हे मिश्रण म्हणजे एका बाटलीत बंद केलेले रॉकेट इंधनच आहे.” या वायूचा वापर हायड्रोजन टॉर्च आणि आयर्न मॅनचे मुख्य शस्त्र असलेल्या ‘रिपल्सर’साठी इंधन म्हणून केला जाऊ शकतो.
सोशल मीडियावर चाहत्यांची दाद
ॲलेक्सने याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने गमतीने म्हटले की, “जीटीए 6 गेम रिलीज होण्यापूर्वी हा माणूस नक्कीच आयर्न मॅन सूट तयार करेल.” तर एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने ॲलेक्सच्या संशोधनाची प्रशंसा करत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲलेक्स घेत असलेले कष्ट पाहून जगभरातील मार्व्हल चाहते थक्क झाले आहेत. आता हा सूट पूर्णपणे तयार होऊन कधी हवेत झेपावतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हे देखील वाचा –











