Home / देश-विदेश / Elections : 5 राज्यांतील निवडणुकीचा आज निकाल ! ममता, स्टॅलिन गढ राखणार? राजकीय हालचालींना वेग

Elections : 5 राज्यांतील निवडणुकीचा आज निकाल ! ममता, स्टॅलिन गढ राखणार? राजकीय हालचालींना वेग

Elections : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. एप्रिल...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Elections : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या राज्यांतील अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकची सत्ता उलथवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. या राज्यात भाजपा विजयी झाल्यास विरोधकांचे देशातील शेवटचे गडही काबीज होतील. या निकालांचा परिणाम देश पातळीवर होणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे.


महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. पश्चिम बंगालमध्ये यावेळी चुरशीची निवडणूक होईल, असे मानले जात आहे. भाजपाने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केले आहे. 2021 मध्ये तृणमूलने 294 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने 77 जागांवर झेंडा फडकावला होता. यावेळी काही एक्झिट पोलनी भाजपाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत विक्रमी 92 टक्के मतदान झाले आहे. जनगणनेचा  निकालावर परिणाम होतो का याची उत्सुकता आहे.  तामिळनाडूत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्ष सत्ता राखण्याचा प्रयत्न करत आहे. स्टॅलिन यांनी आज त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घेतली. फोडाफोडी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे म्हटले जात आहे. 2021 मध्ये 234 पैकी 133 जागा मिळवून द्रमुक सत्तेत आला होता, तर प्रमुख विरोधी पक्ष अण्णा द्रमुकला 66 जागा मिळाल्या होत्या. भाजपाची अण्णा द्रमुकबरोबर युती आहे.

यंदा अभिनेता विजय यांनी आपल्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाला निवडणुकीत उतरवून लढत तिरंगी केली आहे. केरळमध्ये सध्या डाव्या आघाडीचे (एलडीएफ) सरकार असून, गेल्या वेळी तिने 144 पैकी 99 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ बाजी मारेल असा अंदाज आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा जिंकल्या होत्या. तिथे भाजपा सत्ता राखेल, असा चाचण्यांचा कल आहे. तर केंद्रशासित पुद्दुचेरीत ऑल इंडिया एन आर काँग्रेसचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस आणि द्रमुक आघाडीने त्यांना जोरदार टक्कर दिली आहे.


सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत बहुतांश राज्यांचे कल स्पष्ट होतील. मात्र,    निकालानंतर संभाव्य फोडाफोडीच्या भीतीने आज राजकीय हालचालींना वेग आला. आसाममध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूत द्रमुक (डीएमके) पक्ष सतर्क झाले असून, आमदारांची एकजूट कायम ठेवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. आसाममध्ये काँग्रेसने ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा मार्ग अनुसरत आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आमदारांना एकत्र ठेवणे, त्यांचे संरक्षण करणे आणि संभाव्य फोडाफोडी रोखणे यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.


शिवकुमार यांचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ चा दांडगा अनुभव असल्याने काँग्रेसने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ते म्हणाले की, मी आमच्या आमदारांचे संरक्षण, मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी येथे आलो आहे. आसाममध्ये मतदानात यंदा 85.38 टक्के मतदानाची नोंद झाली असून, 2021 च्या तुलनेत सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या मतदानामुळे निकालाबाबत अनिश्चितता वाढली आहे. शिवकुमार यांनी एक्झिट पोलवर टीका करताना ते अत्यल्प नमुन्यावर आधारित असल्याचे म्हटले, तर भूपेश बघेल यांनी त्यांना ‘कॉपी-पेस्ट प्रकार’ म्हणत त्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस आघाडी सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


तामिळनाडूमध्येही द्रमुक आणि काँग्रेस आघाडीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सेल्वा पेरुंदगाई यांनी स्टॅलिन यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही पक्षांनी सांगितले. द्रमुकचे ज्येष्ठ नेते सर्वनन यांनी सांगितले की, आमच्या आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. माध्यमांनीच अनावश्यक चर्चा सुरू केली आहे. निकालानंतरही ही आघाडी कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेट्री कझगम पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विजय यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या दिवशी शिस्त राखण्याचे आणि इतर कोणत्याही पक्षाशी संपर्क न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विजय मिळाल्यास सर्वांनी थेट पक्षाच्या मुख्यालयात एकत्र यावे, असेही त्यांनी सांगितले आहे.  एक्झिट पोलनी तामिळनाडूत द्रमुकला बहुमताचा अंदाज वर्तवला असला तरी भाजपा-नेतृत्वाखालील एनडीएला  85 ते 100 जागा मिळू शकतात, असेही भाकीत काही सर्वेक्षणांनी नोंदले आहे.

बारामतीत सुनेत्रा पवार
राहुरीत कार्डिलेंचा विजय निश्चित

महाराष्ट्रात अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणार्‍या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असून, मुख्य पक्षांनी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याने त्या किती मतांनी निवडून येणार एवढाच प्रश्न आहे. भाजपा आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरीच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कार्डिले यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके निवडणूक लढवत आहेत. या लढतीत अक्षय कार्डिले यांचे पारडे जड आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या