Home / महाराष्ट्र / Baramati Election Result 2026 : बारामतीचा नादच खुळा! सुनेत्रा पवारांनी बारामतीतून मोडले देशातील सर्व रेकॉर्ड; दादां’च्या बालेकिल्ल्यात ‘वहिनीं’चा विश्वविक्रमी विजय….

Baramati Election Result 2026 : बारामतीचा नादच खुळा! सुनेत्रा पवारांनी बारामतीतून मोडले देशातील सर्व रेकॉर्ड; दादां’च्या बालेकिल्ल्यात ‘वहिनीं’चा विश्वविक्रमी विजय….

Baramati Election Result 2026 : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या दोन महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री...

By: Team Navakal
Baramati Election Result 2026 :
Social + WhatsApp CTA

Baramati Election Result 2026 : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या दोन महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली. या दोन्ही जागांवर मतदारांनी सहानुभूती आणि विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे.

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक मताधिक्याचा विक्रम-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केवळ राज्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा विक्रम मोडीत काढत एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

मताधिक्याचा नवा विक्रम: सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत २ लाख १४ हजार ९३ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. त्यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली. यापूर्वी सर्वाधिक मताधिक्याने जिंकण्याचा राष्ट्रीय विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातील भाजप आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी २०२२ मध्ये २ लाख १४ हजार ८३५ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता; हा विक्रम आता सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे.

इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त: ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने सुरुवातीला मोठे प्रयत्न केले होते. मात्र, तरीही २३ उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत सुनेत्रा पवार वगळता इतर सर्वच्या सर्व २२ उमेदवारांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त झाले.

“हा विजय म्हणजे दादांना वाहिलेली ‘भावांजली'” – सुनेत्रा पवार
विजयी झाल्यानंतर अत्यंत भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानताना म्हटले: “अजित दादांशिवाय पार पडलेली ही पहिलीच निवडणूक होती. मला कधीही वाटले नव्हते की, मला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल. आज मन खूप भरून आले आहे. प्रत्येक बारामतीकराने दादांनी केलेल्या विकासकामांची पावती म्हणून आज या मतदानातून त्यांना खऱ्या अर्थाने ‘भावांजली’ वाहिली आहे. आजवर आदरणीय दादांनी बारामतीच्या विकासाची जी स्वप्ने पाहिली होती, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. ही वेळ जल्लोष करण्याची नाही, तर सर्वांनी मिळून दादांना वाहिलेली एक आदरांजली आहे.”

राहुरीत भाजपचा गड कायम; अक्षय कर्डिले यांचा दमदार विजय-
अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. दिवंगत नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र आणि भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत १ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने सहज विजय संपादन केला.

चौरंगी लढतीत विरोधकांचा पराभव-
या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांचे मोठे आव्हान होते. मात्र, कर्डिले यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटच्या २७ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली.

अक्षय कर्डिले यांची भावूक प्रतिक्रिया-
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अक्षय कर्डिले म्हणाले, “आज माझे वडील हयात असते तर त्यांना या विजयाचा सर्वाधिक आनंद झाला असता. हा विजय माझ्या वडिलांच्या सामाजिक कार्याचा आहे. मला ज्या सर्व सामान्य जनतेने आणि कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या