Home / महाराष्ट्र / Pune Parvati Crime : पुणे पुन्हा हादरलं! नातवाला खाऊ आणायला पाठवलं अन घराचा दरवाजा लावून घेतला; पर्वती परिसरात आजोबाचं संतापजनक कृत्य!

Pune Parvati Crime : पुणे पुन्हा हादरलं! नातवाला खाऊ आणायला पाठवलं अन घराचा दरवाजा लावून घेतला; पर्वती परिसरात आजोबाचं संतापजनक कृत्य!

Pune Parvati Crime : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पर्वती पायथ्याशी...

By: Team Navakal
Pune Crime Nasrapur Case
Social + WhatsApp CTA

Pune Parvati Crime : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पर्वती पायथ्याशी असलेल्या एका वस्तीत ७० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या नऊ वर्षांच्या सख्ख्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. सुदैवाने, शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आजोबाला भेटण्यासाठी त्याचा नातू आणि नात त्याच्या घरी आले होते. या नराधमाने क्रूर कारस्थान रचून प्रथम नातूला खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने चिमुकल्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचे घर पत्र्याचे असल्याने आणि परिसरात वर्दळ असल्याने एका स्थानिक महिलेचे लक्ष या धक्कादायक प्रकाराकडे गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ धावून आले, ज्यामुळे पीडितेची या नराधमाच्या तावडीतून सुटका झाली.

पोलिस कारवाई आणि जनक्षोभ-
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. “आरोपीला आमच्या ताब्यात द्या,” अशी मागणी करत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाली होती, मात्र पोलिसांनी संयमाने नागरिकांना शांत केले आणि कठोर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.

पर्वती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “५ मे रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आरोपीवर पोक्सो (POCSO) कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला प्राथमिक तपासणीनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.”

राजकीय पडसाद आणि ‘शक्ती कायद्या’ची मागणी-
राज्यात गेल्या काही दिवसांत नसरापूर, केज आणि पालघर येथे झालेल्या अत्याचारानंतर पुण्याच्या या घटनेने राजकीय वातावरणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, “राज्यात लेकी-बाळी सुरक्षित नसून सरकार केवळ निवडणूक आणि प्रचारात मग्न आहे. नराधमांवर वचक बसवण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा ‘शक्ती कायद्या’चा वटहुकूम काढून तो तात्काळ लागू करावा.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या