Baramati Politics: बारामतीच्या राजकारणात आता युवा पिढी सक्रिय होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांनी बारामतीमध्ये आपल्या ‘जनता दरबारा’चा श्रीगणेशा केला. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार?
जय पवार म्हणाले की, “बारामतीकरांची इच्छा अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची होती. आता सुनेत्रा वहिनी (सुनेत्रा पवार) अतिशय कष्ट घेत आहेत. मला खात्री आहे की २०२९ ची निवडणूक त्या लढवतील आणि त्यांनीच मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी आमची इच्छा आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न
अजित पवार हे दर आठवड्याला जनता दरबार भरवून स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावत असत. तोच वारसा आता जय पवार चालवताना दिसत आहेत.
- वेळ: दर आठवड्याला गुरुवारी जय पवार नागरिकांना भेटणार आहेत.
- प्रलंबित प्रश्न: पहिल्याच दिवशी आरोग्य, वीज, पाणी आणि रस्त्यांच्या समस्या घेऊन नागरिक आले होते.
- कारवाई: पाणी टंचाई आणि इतर प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनाई-शिरसाई आणि नदी जोड प्रकल्पासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या शर्यतीतून माघार?
गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या खासदारकीसाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “मी खासदारकीसाठी अजिबात इच्छुक नाही. मला लोकांसाठी काम करायला आवडते आणि मी सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असेन. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या दिल्लीत आहेत, दोन दिवसांनंतर मुंबईत गेल्यावर या विषयावर अधिक स्पष्टता येईल.”
बारामतीमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि विकासाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हे देखील वाचा –
SSC Result 2026: दहावीचा निकाल आज! रिझल्ट कसा पाहायचा? जाणून घ्या
TCS Nashik Case: 25 दिवसांचा लपाछपीचा खेळ संपला! फरार निदा खान अखेर गजाआड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या









