Home / महाराष्ट्र / Vikas Gogawale : ‘गद्दारी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता मोकळा’;विकास गोगावलेंचा ‘रुद्र’ अवतार-भर सभेत टोचले नेत्यांचे कान!

Vikas Gogawale : ‘गद्दारी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता मोकळा’;विकास गोगावलेंचा ‘रुद्र’ अवतार-भर सभेत टोचले नेत्यांचे कान!

Vikas Gogawale : बिरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी आपल्या आक्रमक भाषणातून...

By: Team Navakal
Vikas Gogawale
Social + WhatsApp CTA

Vikas Gogawale : बिरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी आपल्या आक्रमक भाषणातून पक्षांतर्गत गद्दारी करणाऱ्यांना कडक शब्दांत ताकीद दिली आहे. “आम्हाला सर्व घडामोडींची खडान् खडा माहिती असते, त्यामुळे आम्हाला काही समजत नाही अशा भ्रमात कोणीही राहू नये,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. संघटनेशी प्रतारणा करणाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अन्यथा आम्हाला ‘रुद्रावतार’ धारण करण्यास भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.

विकास गोगावले पुढे म्हणाले की, “कोण कोणाशी संवाद साधत आहे आणि कोणाच्या हालचाली काय सुरू आहेत, यावर आमचे बारीक लक्ष आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणाला दिसत नाही असे नसते, हे लक्षात ठेवावे. आम्ही सध्या शांत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही उमजत नाही. कार्यकर्त्यांनी निष्ठेने संघटनेचे काम करावे. जर कोणाला संघटनेत राहून गद्दारी करायची असेल, तर त्यांनी खुशाल आपला वेगळा मार्ग निवडावा. प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या कामात जर कोणी अडथळा आणला, तर तो मी कदापि सहन करणार नाही.”

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून देताना गोगावले यांनी स्पष्ट केले की, आपल्यासाठी संघटना हेच सर्वस्व असून तेच आपले पोट आहे. त्यामुळे संघटनेवर रोष व्यक्त करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गद्दारी करणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला.

महाडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; चैतन्य म्हामुणकर यांचा शिवसेनेत प्रवेश-
या सभेदरम्यान महाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खरवली-काळीज ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विकास गोगावले यांनी म्हामुणकर यांच्या हातात भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगार पाठोपाठ आता महाडमध्येही राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः खरवली-काळीज सारखी महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या