Shantabai Sathe Passes Away : जगप्रसिद्ध लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील झुंजार नेत्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. शांताबाईंच्या निधनाने अण्णाभाऊंच्या कष्टकरी आणि शोषितांच्या चळवळीचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला एक गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. अविवाहित राहिलेल्या शांताबाईंच्या पश्चात त्यांची लहान बहीण शकुंतला, भाचे, भाची आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
लढाऊ बाणा आणि बालपणीचे संस्कार-
अण्णाभाऊंच्या पत्नी कॉ. जयवंताबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शांताबाईंना बालपणापासूनच कम्युनिस्ट पक्षाचे आणि समतेच्या विचारांचे बाळकडू मिळाले होते. तत्कालीन ‘बाल संघ’ आणि ‘लाल बावटा कला पथका’त त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दडपशाहीच्या काळात, १९४९ मध्ये त्यांनी वयाच्या कोवळ्या वयात काही महिने तुरुंगवासही भोगला होता. रोझा देशपांडे, सत्येंद्र मोरे आणि प्रभाकर मिरजकर यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या समकालीन असलेल्या शांताबाईंनी सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
कौटुंबिक जिव्हाळा आणि माणुसकीचे दर्शन-
शांताबाईंचे व्यक्तिमत्व अत्यंत संवेदनशील आणि उदात्त होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी एका औषध कंपनीत नोकरी सुरू केली. विशेष म्हणजे, आपल्या तुटपुंज्या पगारातून त्या अण्णाभाऊंच्या पहिल्या पत्नीला (कोंडाबाई) नित्यनियमाने आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषतः बंधू मधुकर यांच्याशी त्यांचे अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. अण्णाभाऊंनी लिहिलेले साहित्य, कथा आणि लोकनाट्ये यांची पहिली वाचक होण्याचा मान शांताबाईंनाच मिळत असे.
कला आणि रंगभूमीवरील अमीट ठसा-
सांस्कृतिक चळवळीत शांताबाईंचे योगदान मोलाचे होते. शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्या हिरिरीने सहभागी व्हायच्या. १९७० च्या दशकात ‘काई चालं न गा’ आणि १९८६ मध्ये लोकमंचच्या ‘अकलेची गोष्ट’ यांसारख्या गाजलेल्या लोकनाट्यांत त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन सहाय्य करून आपली छाप पाडली होती. अण्णाभाऊंच्या लेखणीतील दाहकता आणि वास्तव त्यांनी आपल्या अभिनयातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.
अखेरपर्यंत जपलेला स्वाभिमान-
शांताबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी वर्गासाठी आणि पक्षाच्या तत्त्वांसाठी वाहिले. आयुष्याच्या उत्तरार्धात कलाकार मानधन मिळवण्यासाठी त्यांना शासन दरबारी मोठा संघर्ष करावा लागला, मात्र त्यांनी कधीही आपला स्वाभिमान ढळू दिला नाही. “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्येला समाजाने आणि शासनाने जो न्याय व मानसन्मान द्यायला हवा होता, तो मिळाला नाही,” अशी सल त्यांच्या मनात शेवटपर्यंत होती.












