Home / महाराष्ट्र / Vikas Lawande :  भररस्त्यात‘खात्मा करतो’ची धमकी; राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर जीवघेणा हल्ला; पिस्तुल रोखलं, शाई फेकली अन्…

Vikas Lawande :  भररस्त्यात‘खात्मा करतो’ची धमकी; राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर जीवघेणा हल्ला; पिस्तुल रोखलं, शाई फेकली अन्…

Vikas Lawande : पुणे जिल्ह्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. राष्ट्रवादी...

By: Team Navakal
Vikas Lawande 
Social + WhatsApp CTA

Vikas Lawande : पुणे जिल्ह्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी आणि गोरक्षकांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यादरम्यान त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना शारीरिक इजा पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या कृत्यामुळे लोणी काळभोर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विकास लवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची येथे त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. हे प्रवचन आटोपून सकाळी १० वाजेच्या सुमारास ते आपल्या वाहनाने परतत असताना, तीन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. यामध्ये संग्राम भंडारे आणि काही गोरक्षकांचा समावेश असल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे. या हल्लेखोरांनी लवांडे यांच्यावर शाई फेकली, त्यांना गाडीतून ओढून धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. इतकेच नव्हे तर, हल्लेखोरांनी त्यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आहे. “वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरणारे हे नथुराम गोडसे प्रवृत्तीचे लोक आहेत,” अशा तिखट शब्दांत त्यांनी हल्लेखोरांचा निषेध केला आहे. जोपर्यंत पुणे पोलीस आयुक्त या सर्व गुंडांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातच ‘सत्याग्रह’ करण्याचा पवित्रा लवांडे यांनी घेतला आहे.

“रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न”; विकास लवांडेंनी कथन केला अंगावर काटा आणणारा तो थरार-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि हल्ल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना लवांडे यांनी घडलेल्या प्रकाराचे सविस्तर वर्णन केले. “आज जर नागरिक जमा झाले नसते, तर माझा खात्माच झाला असता,” अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. या हल्ल्यामागे वैचारिक वादातून झालेला पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता त्यांच्या विधानातून दिसून येत आहे.

आपल्यावरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगताना विकास लवांडे म्हणाले की, “आज सकाळी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात लोणी काळभोर परिसरातील एका गावात माझी प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता प्रवचन सुरू झाले आणि ते संपवून साधारण दहाच्या सुमारास मी तेथून मार्गस्थ झालो. मी रत्यावरून जात असताना एका निर्जन ठिकाणी अचानक तीन ते चार गाड्यांनी माझ्या वाहनाचा पाठलाग करून मला आडवे घातले. त्या गाड्यांमधून उतरलेल्या १०-१५ जणांच्या टोळक्याने मला जबरदस्तीने गाडीतून ओढून खाली उतरवले.”

लवांडे यांनी पुढे माहिती दिली की, हल्लेखोरांनी त्यांना धक्काबुक्की करत रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीच्या दिशेने नेले. “त्या ठिकाणी संग्राम भंडारे आणि उरुळी कांचन येथील अक्षय कांचन या दोन व्यक्तींना मी ओळखले, मात्र त्यांच्यासोबत असलेले इतर गुंड अनोळखी होते. त्यांनी माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि ओरडल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली. ‘तू आमच्या गुरूंबद्दल का बोलला? तुझा आज आम्ही खात्माच करणार आहोत,’ असे म्हणत त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या माझ्या अंगावर ओतल्या,” असे लवांडे यांनी सांगितले. हा थरार सुरू असतानाच आजूबाजूला नागरिक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर घाबरले. लवांडे यांना पुन्हा एकदा ‘सावध राहा, पुढच्या वेळी तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत हे सर्व गुंड आपल्या गाड्यांमधून वेगाने पसार झाले.

“वैचारिक अस्वस्थतेतूनच माझ्यावर प्राणघातक हल्ला”; विकास लवांडेंनी स्पष्ट केले हल्ल्यामागचे मूळ कारण-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि हल्ल्याच्या प्रकरणाला आता वैचारिक संघर्षाचे वळण मिळाले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी बसलेले असताना लवांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या हल्ल्यामागचे सखोल कारण स्पष्ट केले. “वारकरी संप्रदायात शिरकाव करू पाहणाऱ्या काही धर्मांध आणि वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तींना माझ्या भूमिकांमुळे अस्वस्थता वाटत आहे, त्यातूनच हा सुनियोजित हल्ला करण्यात आला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

विकास लवांडे यांच्या मते, वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा समतावादी आहे, परंतु अलीकडच्या काळात काही विशिष्ट विचारसरणीचे लोक या संप्रदायात घुसखोरी करून आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. “अशा घुसखोरांविरुद्ध मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे ही मंडळी माझ्यावर रागावून होती. संग्राम भंडारे याने यापूर्वी संगमनेरमध्येही असाच हैदोस घातला होता. आज जेव्हा त्याने मला गाठले, तेव्हा ‘आमच्या गुरूंबद्दल तू का बोलतोस?’ असा जाब विचारत मला धमकावण्यास सुरुवात केली. यावरून हे स्पष्ट होते की, हा हल्ला केवळ तात्कालिक नसून तो एका विशिष्ट विचारसरणीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,” असे लवांडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

हल्ल्याचा थरार सांगताना त्यांनी आपल्या चालकाचे आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले. ते म्हणाले, “रस्त्यावर अचानक तीन-चार गाड्यांनी मला वेढले होते. हल्लेखोरांची संख्या १५ च्या आसपास होती. सुदैवाने माझा चालक सोबत होता आणि गोंधळ ऐकून परिसरातील नागरिक तातडीने जमा झाले, त्यामुळे माझा जीव वाचला. अन्यथा, ज्या पद्धतीने त्यांनी पिस्तूल रोखून मला स्मशानभूमीकडे ओढत नेले होते, ते पाहता आज माझा खात्मा झाला असता.” लवांडे यांनी हे देखील स्पष्ट केले की, संग्राम भंडारे व्यतिरिक्त अन्य हल्लेखोर गुंड प्रवृत्तीचे असून त्यांची माझी कोणतीही वैयक्तिक ओळख नव्हती. सध्या विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ‘सत्याग्रह’ पुकारला आहे. “जोपर्यंत त्या सर्व १५ हल्लेखोरांना आणि या कटात सामील असलेल्या मुख्य सूत्रधारांना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून हलणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

“हा संतापाचा नैसर्गिक उद्रेक”; विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर आचार्य तुषार भोसले यांची परखड प्रतिक्रिया-
भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेवर आपले भाष्य करताना, हा प्रकार म्हणजे जनमानसातील संतापाचा परिपाक असल्याचे म्हटले आहे. विकास लवांडे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या सातत्यपूर्ण विधानांमुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

आचार्य तुषार भोसले यांनी विकास लवांडे यांच्यावर टीका करताना सांगितले की, “ज्या महान संतांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली आणि ज्यांच्यामुळे आज हा संप्रदाय अखंड टिकून आहे, अशा पूजनीय व्यक्तींबद्दल लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने करत होते. ज्या आध्यात्मिक गुरूंनी महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे भव्य कार्य उभे केले आणि ज्यांचे लाखो निष्ठावान अनुयायी राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत, त्यांना वारंवार ‘घुसखोर’ म्हणून हिणवणे हा वारकरी संप्रदायाचा घोर अपमान आहे. या सातत्यपूर्ण अपमानस्पद टीकेमुळेच भाविकांच्या मनात संतापाची लाट उसळली होती आणि त्याच अस्वस्थतेतून हा प्रकार घडलेला दिसतो.”

या प्रकरणाचा संदर्भ घेत आचार्य भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “माझे शरद पवार यांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या अशा ‘बगल बच्च्यांना’ त्वरित आवर घालावा. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील संतांच्या अस्मितेशी खेळणे आता थांबवले पाहिजे. लोकशाहीत कोणालाही संतांचा अनादर करण्याचा अधिकार नाही आणि जर कोणी अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान करत असेल, तर समाजातून अशाच उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा सामना त्यांना करावा लागेल.

“मनुवादी वृत्तीने ज्ञानोबा-तुकोबांनाही छळले होते”; विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अत्यंत कडक शब्दांत सरकारचा निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे सत्तेच्या आशीर्वादाने फोफावलेल्या कट्टरतावादी प्रवृत्तीचा परिपाक असल्याची टीका त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या पवित्र आणि थोर वारकरी संप्रदायात ज्या कट्टरतावाद्यांनी घुसखोरी केली आहे, त्यांच्या विरोधात विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह सातत्याने आवाज उठवत आहेत. याच भूमिकेचा राग मनात धरून संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी लवांडे यांच्यावर शाई ओतून जो भ्याड हल्ला केला, तो अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारे विचार दाबण्यासाठी केलेले हल्ले वारकरी संप्रदायासाठी नवीन नाहीत. इतिहासातही ज्ञानोबा-तुकोबांना तत्कालीन मनुवादी वृत्तीने अशाच प्रकारे छळले होते. त्यामुळे अशा गुंडांच्या हल्ल्याला आम्ही कदापि भीक घालणार नाही.”

हल्ल्याच्या गांभीर्याकडे लक्ष वेधताना रोहित पवार यांनी गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, “या हल्ल्यादरम्यान विकास लवांडे यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणातील सर्व दोषींच्या मुसक्या आवळाव्यात. तसेच, लवांडे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांना त्वरित पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे. जर सरकारने या गुंडांवर कडक कारवाई केली नाही, तर हा हल्ला सत्तेच्या आशीर्वादानेच झाला आहे, असे जनतेने समजायचे का?”शेवटी इशारा देताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, यापुढे विकास लवांडे यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल.

“राजकीय पदाधिकाऱ्याला भररस्त्यात संपवण्याचा प्रयत्न”; विकास लवांडेंवरील हल्ल्यावरून सुप्रिया सुळे यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटत आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हातोबाची आळंदी ते पुणे प्रवासादरम्यान लवांडे यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ राजकीय वैमनस्यातून झालेली शाईफेक नसून, तो एका लोकशाहीतील आवाजाला कायमचे संपवण्याचा प्रयत्न होता, असे गंभीर विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी या घटनेच्या गांभीर्याकडे लक्ष वेधताना सांगितले की, “विकास लवांडे हे प्रवासात असताना त्यांना अडवून ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला, ती बाब अतिशय चिंताजनक आहे. हल्लेखोर केवळ शाई घेऊन आले नव्हते, तर त्यांच्याकडे घातक हत्यारे देखील होती. सुदैवाने या हल्ल्यात लवांडे यांना कोणतीही गंभीर शारीरिक इजा झाली नाही, मात्र भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे, हे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे आहे.”

गृहविभागाच्या अपयशावर बोट ठेवताना सुळे पुढे म्हणाल्या की, “अशा प्रकारे गुंडांना भरदिवसा हल्ला करण्याचे धाडस कोणाच्या वरदहस्तामुळे प्राप्त झाले आहे, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. गृहमंत्री महोदयांनी केवळ राजकारण न करता या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या