Vivek Oberoi On Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या निवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींवर विश्वास दर्शवत त्यांना तब्बल २,१८,८०६ मतांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी केले. या विजयामुळे ‘बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती’ हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण २३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. मात्र, मतदारांनी इतर सर्व पर्यायांना नाकारत पवार कुटुंबाच्या वारशावर शिक्कामोर्तब केले. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढतानाच, सुनेत्रा पवार यांनी आपल्या संयमी नेतृत्वाच्या जोरावर हे ऐतिहासिक यश खेचून आणले आहे. त्यांच्या या विजयाने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या या घवघवीत यशानंतर बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे विवेकने ही पोस्ट मराठी भाषेत लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनेत्रा वहिनींसोबतचा एक स्नेहपूर्ण फोटो शेअर करत त्याने लिहिले की “सुनेत्रा वहिनी, अजित दादांनी उभारलेला भक्कम वारसा आज बारामतीकरांच्या प्रेमातून पुन्हा एकदा दिसून आला. तुमचा हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अभिमानास्पद नव्या पर्वाची सुरुवात आहे. हे यश फक्त तुम्हीच मिळवू शकत होतात. तुम्हीच अजितदादांच्या खऱ्या आणि योग्य वारसदार आहात.” विवेक ओबेरॉयने आपल्या संदेशातून सुनेत्रा पवार यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतानाच, त्यांना अजितदादांच्या कामाचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या ‘योग्य वारसदार’ म्हणून संबोधले आहे.
@SunetraA_Pawar Vahini, Ajit Dada’s presence remains through the incredible legacy he built, now beautifully reflected in the outpouring of love from Baramati. This historic win marks a proud new chapter for Maharashtra’s first woman Deputy Chief Minister, a feat only you could… pic.twitter.com/K7G78GaoEN
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 9, 2026
“सूर्य मावळला तरी चंद्राच्या प्रकाशात तो भासतोच…” – विवेक ओबेरॉय
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर केवळ राजकीयच नव्हे, तर सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातूनही सुनेत्रा पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना अजितदादांच्या जनसेवेच्या वारशाचा गौरव केला आहे. विवेकने आपल्या संदेशात नमूद केले की, “अजितदादांनी आयुष्यभर जनतेसाठी केलेले कार्य, त्यांचे लोकांशी असलेले अतुट नाते आणि कोणत्याही संकटात डगमगून न जाता खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती, यामुळेच ते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले. आज बारामतीकरांनी त्यांच्या अर्धांगिनीवर जो विश्वास दर्शवला आहे, तोच दादांच्या वारशाचा खरा सन्मान आहे. सुनेत्रा वहिनी या वारशाच्या खऱ्या उत्तराधिकारी आहेत.”
विवेक ओबेरॉयने आपल्या पत्राचा शेवट एका अतिशय हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण ओळीने केला आहे. त्याने लिहिले की, “सूर्य दिसत नसला तरी तो चंद्राच्या पाठीशी असतोच!” या वाक्यातून त्याने अजितदादांचे अस्तित्व सदैव सुनेत्रा वहिनींच्या कार्यामागे प्रेरणास्थान म्हणून राहील, अशी भावना व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासाठी आगामी काळ हा विकासाचे ‘सुवर्णयुग’ ठरेल, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.
बारामतीतून मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यावर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य-
दुसरीकडे, या अभूतपूर्व विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयत आणि भावूक प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीकरांचे आभार मानताना त्यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय दिवंगत अजित पवार यांच्या कार्याला दिले. त्या म्हणाल्या की, “अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक माझ्यासाठी अत्यंत कठीण आणि भावनिक होती. आयुष्याच्या या वळणावर मला स्वतःला निवडणूक रिंगणात उतरावे लागेल, अशी मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मात्र, आज बारामतीच्या सुज्ञ जनतेने मला जे भरभरून मतदान केले आहे, ती केवळ मते नसून अजितदादांच्या जनसेवेला आणि त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ती खरी श्रद्धांजली आहे.”
सुनेत्रा पवार यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, बारामती हे त्यांच्यासाठी केवळ एक मतदारसंघ नसून ते एक विस्तारित कुटुंब आहे. “दादांनी विकासाचा जो रथ गतिमान केला होता, तो वारसा तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पुढे नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” असा शब्द त्यांनी यावेळी बारामतीकरांना दिला.










