PM Modi : जागतिक स्तरावर निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि इंधनाचे वाढते दर या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःपासून बदलाची सुरुवात करत एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच, पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या निम्मी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ला (SPG) विशेष निर्देश दिले आहेत.
सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यात कपात-
पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाची प्रचिती त्यांच्या नुकत्याच झालेल्या वडोदरा आणि गुवाहाटी दौऱ्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले असताना, पंतप्रधानांच्या ताफ्यात नेहमीपेक्षा ५० टक्के कमी वाहने दिसून आली. विशेष म्हणजे, ताफ्यात नवीन वाहनांची खरेदी न करता उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सुरक्षेच्या निकषांशी कोणतीही तडजोड न करता संसाधनांचा किमान वापर कसा करता येईल, यावर त्यांनी भर दिला आहे.
देशवासियांना सात कलमी आवाहनाद्वारे साधेपणाचा मंत्र-
हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो आणि ‘कारपूलिंग’चा वापर वाढवण्याचे सुचवले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी खालील सात महत्त्वाचे मुद्दे मांडले:
इंधन बचत: वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे.
सोन्याची खरेदी टाळा: सोन्याच्या आयातीमुळे देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर बाहेर जाते, त्यामुळे सध्यातरी सोने खरेदी मर्यादित ठेवावी.
वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मीटिंग: इंधन आणि वेळेची बचत करण्यासाठी सरकारी व खासगी संस्थांनी जास्तीत जास्त काम ऑनलाइन पद्धतीने करावे.
परदेश प्रवास टाळा: सद्यस्थितीत अनावश्यक परदेश दौरे टाळून देशांतर्गत पर्यटनाला चालना द्यावी.
स्वदेशीचा आग्रह: आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा (Local for Vocal) जास्तीत जास्त वापर करावा.
नैसर्गिक शेती: रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा.
खाद्यतेलाचा वापर: आरोग्यासाठी आणि आयातीचा खर्च कमी करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर संतुलित ठेवावा.










