Home / महाराष्ट्र / Thane Crime : मृत वडिलांच्या बनावट स्वाक्षरीने बहिणीची फसवणूक; आईसह दोन भावांवर गुन्ह्याची नोंद

Thane Crime : मृत वडिलांच्या बनावट स्वाक्षरीने बहिणीची फसवणूक; आईसह दोन भावांवर गुन्ह्याची नोंद

Thane Crime : रक्ताच्या नात्यातील विश्वासार्हतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. दिवंगत वडील आणि भाजपचे ज्येष्ठ...

By: Team Navakal
Thane Crime  :
Social + WhatsApp CTA

Thane Crime : रक्ताच्या नात्यातील विश्वासार्हतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. दिवंगत वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले यांचे थोरले बंधू आनंदराव करंजुले यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डल्ला मारण्यासाठी सख्ख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटाचा पर्दाफाश पीडित बहिणीने माहिती अधिकाराचा (RTI) आधार घेऊन केला आहे.

नेमके प्रकरण काय?
अंबरनाथमधील रहिवासी अर्चना आनंदराव करंजुले यांचे वडील आनंदराव करंजुले यांचे ६ जुलै २०२१ रोजी निधन झाले होते. आनंदराव यांच्या नावे अंबरनाथ आणि अहमदनगर या ठिकाणी घरे, दुकाने आणि शेतजमिनी अशी कोट्यवधींची मालमत्ता आहे. वडिलांच्या निधनानंतर या मालमत्तेचे वारसदार नोंदवण्यासाठी बँकेकडून वारंवार पत्रव्यवहार होत होता. यामुळे अर्चना यांनी आपले बंधू प्रशांत आणि संतोष करंजुले यांच्याकडे वारस दाखल्याबाबत विचारणा केली. मात्र, संपत्तीच्या लोभापायी दोन्ही भावांनी त्यांच्याशी संवाद तोडला.

बनावट मृत्यूपत्राचा असा झाला उलगडा-
अर्चना यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, त्यांच्या आईने आणि दोन्ही भावांनी न्यायालयात वारस हक्कासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी वडिलांनी लिहून दिलेले एक मृत्यूपत्र न्यायालयात सादर केले. या मृत्यूपत्रानुसार अर्चना यांना सर्व मालमत्तेतून बेदखल करण्यात आले होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर मृत्यूपत्र कसे तयार झाले आणि त्यावरील स्वाक्षरी वडिलांची नसल्याचा संशय अर्चना यांना आला.

अर्चना यांनी जिद्दीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि माहिती अधिकारांतर्गत मुद्रांक कार्यालयातून त्या स्टॅम्प पेपरची माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीने सर्वांनाच धक्का बसला. जे मृत्यूपत्र १२ ऑक्टोबर २०२२ चे असल्याचे भासवले होते, त्यासाठी वापरलेला स्टॅम्प पेपर प्रत्यक्षात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी वितरित झाला होता. म्हणजेच, आनंदराव करंजुले यांच्या निधनानंतर तब्बल दोन वर्षांनी तो कागद चलनात आला होता. मृत व्यक्तीने आपल्या निधनानंतर दोन वर्षांनी सही कशी केली? या एका पुराव्याने कुटुंबीयांचा बनाव उघड पाडला.

पोलीस दप्तरदिरंगाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप-
आपल्याच कुटुंबातील सदस्यांनी केलेली ही फसवणूक पाहून अर्चना यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र, आरोपींचा राजकीय प्रभाव असल्याने सुरुवातीला अंबरनाथ पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. “आरोपी आमचे मित्र आहेत,” असे धक्कादायक उत्तर पोलिसांकडून मिळाल्याचा आरोपही अर्चना यांनी केला. अखेर त्यांनी हार न मानता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त (DCP) अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहानिशा करण्याचे आदेश दिले.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात आई सुनंदा करंजुले, दोन्ही भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले, तसेच बनावट मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करणारे साक्षीदार अमित जैन आणि प्रदीप सिंग यांचा समावेश आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या