Pune Bomb Scare: पुण्यातील हडपसर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका खळबळजनक घटनेने पोलिसांची झोप उडवली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका नामांकित हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॉम्बसारखी संशयास्पद वस्तू आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या वस्तूवर ७ तासांचा टायमर सेट करण्यात आला होता.
रात्रभर चाललं हायव्होल्टेज ‘बॉम्ब नाट्य’
हॉस्पिटलच्या बाहेर संशयास्पद सर्किट आणि टायमर असलेली पांढऱ्या रंगाची वस्तू दिसताच नागरिकांनी पोलिसांना कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने ‘बॉम्ब शोधक व नाशक पथकाला’ (BDDS) पाचारण केले. सोबतच अग्निशमन दल आणि गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली. टायमरवर उरलेला वेळ पाहून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ परिसराची नाकेबंदी केली.
ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात केला स्फोट
तपासणीमध्ये ही वस्तू ‘लो-ग्रेड आयईडी’ (IED) असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये स्फोटक सामग्रीसह सर्किट आणि टायमर बसवण्यात आला होता. बीडीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरीने ही वस्तू ताब्यात घेतली आणि हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन ती यशस्वीरित्या निकामी (Diffuse) केली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, “प्राथमिक तपासात हे लो-ग्रेड एक्सप्लोझिव्ह आयईडी असल्याचे दिसून आले आहे. माहिती मिळताच आमच्या पथकांनी त्वरित हालचाल केली आणि शहरावरील मोठे संकट टळले. बीडीडीएस पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.”
तपासासाठी तीन पथके तैनात
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस, पुणे गुन्हे शाखा आणि एटीएस (ATS) अशी तीन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. हॉस्पिटल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू असून, ही वस्तू तिथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली, याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.









