Ganesh Naik : पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जातीपातीच्या राजकारणावरून नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. सार्वजनिक व्यासपीठांवर ‘जात मानत नाही’ असे म्हणणाऱ्या नेत्यांकडून जेव्हा जातीचा उल्लेख होतो, तेव्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडते. असाच काहीसा प्रकार राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्या एका विधानामुळे घडला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित ‘राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलना’त बोलताना नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख करत एक खळबळजनक वक्तव्य केले. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने जाणीवपूर्वक त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, असे विधान नाईक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या गणेश नाईक यांनी जातीच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले की, सामाजिक जीवनात वावरताना जात ही कधी माणसासाठी वरदान ठरते, तर कधी ती शाप ठरते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना नाईक म्हणाले की, फडणवीस हे एक चतुरस्र आणि अभ्यासू नेतृत्व असून त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, इतकी सकारात्मक कामगिरी करूनही, केवळ त्यांची जात ब्राह्मण आहे, याच कारणावरून त्यांना अडचणीत आणण्याचे आणि त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. नाईक यांच्या या विधानाने व्यासपीठावरील आणि समोरील उपस्थित समुदायात एकच शांतता पसरली आणि राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.
गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांच्या कोंडीचा उल्लेख केला असला, तरी हा रोख नेमका कोणाकडे होता, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याकडून झाला, विरोधी पक्षाकडून झाला की एखाद्या विशिष्ट जातीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडून, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कोणत्याही नावाचा थेट उल्लेख न करता नाईक यांनी दिलेला हा सूचक इशारा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि त्या अनुषंगाने फडणवीस यांच्यावर होणारी टीका, या पार्श्वभूमीवर नाईक यांचे हे विधान अत्यंत कळीचे ठरले आहे.
याच कार्यक्रमात गणेश नाईक यांनी केवळ जातीवरच नव्हे, तर राजकारणातील ‘अर्थकारणा’वरही अत्यंत रोकठोक भाष्य केले. आजच्या काळात केवळ स्वच्छ विचारसरणी किंवा प्रामाणिकपणाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतीलच, याची खात्री देता येत नाही, असे कटू सत्य त्यांनी मांडले. नाईक यांच्या मते, राजकारणात यशस्वी होण्यासाठी अर्थकारण अत्यंत प्रभावी ठरत आहे. माणसाचे मन स्वच्छ असेल तर त्याला मानसिक स्थिरता मिळते आणि त्यातून समाजकार्य घडते, हे जरी खरे असले तरी, सध्याच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय पानही हलत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.










