NEET Paper Leak : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या कटातील एक मुख्य सूत्रधार असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या कारवाईमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी आणि यंत्रणेतील ‘तज्ज्ञां’कडून होणारा विश्वासघात उघड झाला आहे.
पदाचा गैरवापर आणि गोपनीयतेचा भंग
मनीषा मांढरे या पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभवाचा विचार करून ‘एनटीए’ने त्यांची नीट परीक्षेसाठी ‘विषय तज्ज्ञ’ म्हणून नियुक्ती केली होती. या संवेदनशील पदामुळे त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अॅक्सेस मिळाला होता. मात्र, ज्या यंत्रणेने त्यांच्यावर विश्वास टाकला, त्याच यंत्रणेची गोपनीयता धाब्यावर बसवून त्यांनी प्रश्नपत्रिकांची माहिती लीक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
असा रचला गेला कट
सीबीआयच्या तपासातून समोर आले की, एप्रिल २०२६ च्या सुमारास मांढरे यांनी मनीषा वाघमारे या मध्यस्थीच्या मदतीने हा कट रचला. मांढरे यांनी आपल्या राहत्या घरी काही निवडक विद्यार्थ्यांसाठी छुप्या पद्धतीने ‘कोचिंग क्लासेस’ आयोजित केले होते. या वर्गांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न संच देण्याऐवजी थेट परीक्षेत विचारले जाणारे प्रश्नच लिहून दिले. इतकेच नव्हे, तर पाठ्यपुस्तकांमध्ये विशिष्ट खुणा करून त्यांना उत्तरांची तयारी करून घेतली. ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेत आलेले बहुतांश प्रश्न मांढरे यांनी आधीच दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
देशव्यापी अटकसत्र आणि मास्टरमाइंडचा शोध
या प्रकरणाची व्याप्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून ती दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरपर्यंत पसरलेली आहे. सीबीआयने आतापर्यंत एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, ज्यापैकी ५ आरोपी महाराष्ट्रातील आहेत. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) पी.व्ही. कुलकर्णी हा असल्याचे समोर आले आहे. कुलकर्णी हा लातूर येथील एका महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक असून तो आणि मनीषा मांढरे थेट एकमेकांच्या संपर्कात होते.
तपासाची सद्यस्थिती आणि जप्त साहित्य
गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात सहा ठिकाणी छापे टाकून लॅपटॉप, मोबाईल फोन, बँकांचे व्यवहार आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. हे सर्व साहित्य सध्या न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुण्यातून पकडलेल्या दोन आरोपींना ‘ट्रान्झिट रिमांड’वर दिल्लीला नेण्यात आले आहे.
गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश-
तपासादरम्यान या गुन्ह्याची साखळी खालीलप्रमाणे उघड झाली आहे:
१. प्रसार: पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी मिळवलेली माहिती मनीषा वाघमारेकडे पोहोचवली.
२. डिजिटल वितरण: वाघमारेकडून ही माहिती धनंजय लोखंडे याच्याकडे गेली. लोखंडेचा मित्र शुभम खैरनार याने २९ एप्रिल रोजी या प्रश्नांची ‘पीडीएफ’ फाईल तयार करून ती ‘टेलिग्राम’वरून प्रसारित केली.
३. आर्थिक व्यवहार: ही पीडीएफ फाईल गुरुग्रामच्या यश यादवला पाठवण्यात आली, ज्यासाठी १५ लाख रुपयांचा व्यवहार झाला. त्यानंतर यश यादवने ही माहिती मांगीलाल, विकास आणि दिनेश बिवाल या तीन आरोपींना विकून नफा कमावण्याचा प्रयत्न केला.










