Pune City Bakery: पुण्यातील गर्दी आणि गजबजाटाने भरलेल्या एका रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे एक साधे, शांत दुकान दिसते, ज्याच्यावर झाडाची सावली पडलेली असते. आजकालच्या झगमगाटी आणि सोशल मीडियासाठी इन्स्टाग्राम रील्स पुरवणाऱ्या कॅफेंसारखे हे दुकान अजिबात नाही.
पण या साध्या दिसणाऱ्या दुकानामागे लपला आहे तब्बल १00 वर्षांचा इतिहास, पिढ्यानपिढ्या जपेलेल्या परंपरा आणि अस्सल जुन्या रेसिपीज. ही आहे पुण्याची प्रसिद्ध ‘सिटी बेकरी’ (City Bakery).
इथे तुम्हाला चकचकीत फर्निचर किंवा आधुनिक डिझाईन दिसणार नाही, पण लाकडी काचेच्या कपाटांमध्ये ठेवलेले ताजे, खमंग पदार्थ, भिंतीवरील फळ्यावर खडूने लिहिलेला आजचा मेन्यू आणि जुने अँटीक स्विचबोर्ड्स या बेकरीचे विंटेज सौंदर्य अधिकच वाढवतात.
१00 वर्षांचा गौरवशाली इतिहास
बेकरीत पाऊल ठेवताच तुमचे स्वागत करतात ‘सलामात इराणी’. ते या बेकरीची धुरा सांभाळणारी तिसरी पिढी आहेत. आता त्यांचे सुपुत्र आस्ताद, जे स्वतः एक पेस्ट्री शेफ आहेत, तेही त्यांना या कामात मदत करतात.त्यांची अस्सल पारशी आणि इराणी शैलीतील बोलण्याची पद्धत ग्राहकांचे मन जिंकून घेते.
सलामात यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अचूक तारीख माहीत नसली तरी ही बेकरी १00 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्यांचे आजोबा इराणमधून स्थलांतरित होऊन पुण्यात आले होते आणि त्यांनीच या बेकरीची सुरुवात केली. तेव्हापासून हा व्यवसाय या कुटुंबासाठी घरासारखाच झाला आहे.
आजच्या कॉर्पोरेट जगापेक्षा पूर्णपणे वेगळी अशी या बेकरीची वेळ आहे. ही बेकरी सकाळी 6 वाजता उघडते आणि दुपारी 1 वाजता बंद होते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 4 ते रात्री 7 या वेळेतच ती सुरू असते. या बेकरीचे स्वतःचे नियम आहेत आणि इथल्या नियमित ग्राहकांनाही तेच आवडते.
त्याच रेसिपी आणि ५0 वर्षे जुन्या मशिन्स
सिटी बेकरीमध्ये ग्राहकांसाठी दोन प्रकारचे मेन्यू उपलब्ध आहेत. पहिल्या मेन्यूमध्ये खारी, टोस्ट, श्रुजबरी बिस्किटे, मिल्क ब्रेड, जिरा बटर यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे. तर दुसऱ्या नवीन मेन्यूमध्ये गार्लिक टोस्ट, चिकन पफ, वॉलनट पाय आणि अॅपल पाय यांसारखे आधुनिक पदार्थ मिळतात.
इथल्या पफ आणि बिस्किटांच्या कुरकुरीतपणाचे रहस्य फक्त जुन्या रेसिपीजमध्ये नाही, तर इथल्या यंत्रांमध्येही दडलेले आहे. या बेकरीत वापरल्या जाणाऱ्या मशिन्स जवळपास 50 वर्षे जुन्या आहेत. यातील अनेक मशिन्स गुजरातमधील ‘अलंग’ येथून आणल्या गेल्या आहेत, जे जगातील सर्वात मोठे जहाज तोडण्याचे केंद्र (Ship-breaking yard) म्हणून ओळखले जाते. तिथल्या जुन्या जहाजांच्या धातूपासून या मशिन्स तयार करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील अनेक पिढ्या इथला कागदात गुंडाळलेला ब्रेड आणि बिस्किटे खात मोठ्या झाल्या आहेत. आता सोशल मीडियामुळे नवीन तरुण पिढीही उत्सुकतेपोटी किंवा जुन्या आठवणींचा शोध घेत इथे पोहोचत आहे.
पुण्यातील इतरही ऐतिहासिक बेकऱ्या
पुण्यात केवळ सिटी बेकरीच नाही, तर रॉयल बेकरी (Royal Bakery), हुसेनी बेकरी (Husseny Bakery) आणि रामसार बेकरी (Ramsar Bakery) यांसारख्या इतरही अनेक बेकऱ्या गेल्या अनेक दशकांपासून पुण्याची खाद्यसंस्कृती समृद्ध करत आहेत.
हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!












