Rohit Pawar : कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांमुळे त्रस्त झालेल्या कांदा उत्पादकांनी आज लासलगाव बाजार समितीत आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी एल्गार’ आंदोलनाद्वारे सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार रोहित पवार यांनी स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीच्या आवारात प्रवेश केला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि सरकारच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी करत हजारो शेतकरी या रणधुमाळीत सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात मतांच्या राजकारणासाठी सरकार २४ रुपये भाव जाहीर करते आणि प्रक्रिया संपताच हा दर १२ रुपयांवर आणला जातो. “साडेबारा रुपये भाव देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, जिथे पाच ट्रेलर उत्पादन अपेक्षित होते, तिथे केवळ तीन ट्रेलर हाती लागत आहे. शेतकऱ्यांचा प्रति किलो उत्पादन खर्च १८ रुपयांच्या घरात असताना, प्रत्यक्ष बाजारपेठेत त्यांना २ ते ३ रुपये दराने माल विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कांद्याला किमान २२ ते २४ रुपये प्रति किलो दर मिळालाच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली.
यावेळी रोहित पवार यांनी ‘नाफेड’ (NAFED) आणि राज्य सरकारच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मागील वेळी जाहीर केलेल्या २०० रुपये अनुदानापैकी प्रत्यक्षात केवळ ५० रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडले असून उर्वरित १५० रुपयांचा अपहार झाल्याचा दावा त्यांनी केला. नाफेडच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून ‘खरात’ नामक व्यक्तीने या माध्यमातून पैसा लाटल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच पाशा पटेल यांच्या समितीवर टीका करताना त्यांनी विचारले की, दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आश्वासन देणाऱ्या या समितीने नेमके काय साध्य केले?
आंदोलनातील सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कमरेला केळीची पाने गुंडाळून सरकारचा निषेध केला. “जर कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांवर आपले कपडे उतरवण्याची वेळ येईल आणि भविष्यात केवळ केळीची पाने गुंडाळून जगण्याची वेळ येईल,” अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.










