Fuel Price Hike: पश्चिम आशियातील प्रदीर्घ संघर्षामुळे आधीच वाहतूक आणि लॉजिस्टिक खर्चाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. देशात पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 87 पैसे आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 91 पैशांची वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने अवघ्या काही दिवसांपूर्वीच देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर एकाच आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे सरकारी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.
Fuel Price Hike: सरकारचे ‘पॅनिक बायिंग’ न करण्याचे आवाहन
कच्चे तेल आणि एलपीजीच्या वाढत्या खर्चामुळे भारतीय तेल कंपन्या सध्या प्रचंड आर्थिक दबावाखाली आहेत. त्यामुळे पुढील दरवाढ कधी होईल, हे आताच सांगता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
- पश्चिम आशियातील संकट सुरू होऊन 2.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असून अजूनही हॉर्मुझ सामुद्रधुनीमधील परिस्थिती सामान्य झालेली नाही.
- असे असले तरी, देशातील तेल शुद्धीकरण कारखाने (रिफायनरी) कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असून देशभरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
Fuel Price Hike: कोलकात्यामध्ये सर्वाधिक वाढ; मेट्रो शहरांमधील स्थिती
या दरवाढीमध्ये कोलकाता शहरात पेट्रोलच्या किमतीत सर्वाधिक म्हणजेच 96 पैशांची वाढ झाली आहे, ज्यामुळे तिथे पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.70 रुपये झाला आहे. तसेच तेथील डिझेलचा दर 94 पैशांनी वाढून प्रति लिटर 96.07 रुपये झाला आहे. भारतात लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 85 ते 90 टक्के तेल आयात केले जाते, त्यामुळे जागतिक बाजारातील किमतींचा भारताच्या परकीय चलन साठ्यावर थेट परिणाम होत आहे.
Fuel Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भडका
जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात सुमारे 8% वाढ झाल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरच्या पार गेली आहे. दुसरीकडे, वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट (WTI) क्रूड देखील प्रति बॅरल 107 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. या जागतिक दरवाढीमुळेच भारतीय तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर वाढवावे लागत आहेत.









