Melody Video : राजकारण आणि समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचा शेअर बाजारावर कसा विचित्र परिणाम होऊ शकतो, याचे एक रंजक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एका भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शेअर बाजारात ‘पारले इंडस्ट्रीज’च्या शेअर्समध्ये अचानक तेजी पाहायला मिळाली. मात्र, धक्कादायक बाब अशी की, ज्या ‘मेलेडी’ टॉफीमुळे ही वाढ झाली, ती कंपनी आणि शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली कंपनी यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही.
‘मेलेडी’ टॉफी आणि सोशल मीडिया ट्रेंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलेडी’ (Melody) टॉफीचे एक पाकीट भेट देताना दिसत आहेत. या दोन नेत्यांच्या नावावरून (मोदी + मेलोनी) सोशल मीडियावर आधीच ‘मेलेडी’ (#Melody) हा हॅशटॅग लोकप्रिय आहे. मेलोनी यांनीदेखील हा व्हिडिओ शेअर करत “या भेटीबद्दल धन्यवाद” असे लिहिले. या गमतीशीर भेटीमुळे इंटरनेटवर ‘मेलेडी’ या ब्रँडची जोरदार चर्चा सुरू झाली.
गुंतवणूकदारांचा मोठा गैरसमज
या ट्रेंडचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला. अनेक किरकोळ गुंतवणूकदारांना असे वाटले की ‘मेलेडी’ टॉफी बनवणारी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. नाव साधर्म्यामुळे गुंतवणूकदारांनी ‘पारले इंडस्ट्रीज’ (Parle Industries) या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. परिणामी, मंगळवारी या कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ५.२५ रुपयांवर पोहोचला. गेल्या आठवडाभरात या शेअरमध्ये ७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
वास्तव: ‘मेलेडी’ बनवणारी कंपनी वेगळीच!
गुंतवणूकदारांनी ज्या ‘पारले इंडस्ट्रीज’चे शेअर्स खरेदी केले, ती कंपनी प्रत्यक्षात ‘मेलेडी’ टॉफी बनवत नाही. ‘मेलेडी’चे उत्पादन ‘पारले प्रॉडक्ट्स’ (Parle Products) या प्रख्यात कंपनीद्वारे केले जाते. हीच कंपनी ‘पारले-जी’, ‘मोनॅको’ आणि ‘क्रॅक जॅक’ यांसारखी लोकप्रिय उत्पादने बनवते. महत्त्वाची बाब म्हणजे ‘पारले प्रॉडक्ट्स’ ही एक खाजगी मालकीची कंपनी असून ती शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) नाही. दुसरीकडे, बीएसईवर (BSE) सूचीबद्ध असलेली ‘पारले इंडस्ट्रीज’ ही पूर्णपणे वेगळी कंपनी असून तिचा टॉफी व्यवसायाशी कोणताही थेट संबंध नाही.
शेअरची ऐतिहासिक कामगिरी आणि जोखीम
केवळ एका सोशल मीडिया ट्रेंडमुळे शेअर्समध्ये वाढ झाली असली तरी, ‘पारले इंडस्ट्रीज’ची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही. आजच्या वाढीनंतरही हा शेअर दीर्घकालीन घसरणीतच आहे. गेल्या तीन महिन्यांत ४१%, सहा महिन्यांत ४६% आणि एका वर्षात ६८ टक्क्यांहून अधिक तोट्यात हा शेअर व्यवहार करत आहे.
जेव्हा किरकोळ गुंतवणूकदार केवळ नावातील साधर्म्यामुळे किंवा सोशल मीडियावरील वावड्यांमुळे ‘पेनी स्टॉक्स’मध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा अशा प्रकारचे धोके निर्माण होतात.










