Home / महाराष्ट्र / Nashik Crime News : नाशिकमध्ये क्रूरतेची सर्व सीमा पार! निष्पाप सुनेचा चक्क ८ वेळा सलग गर्भपात, अमानुष मानसिक-शारीरिक छळ; कारण ऐकून पोलीसही हादरले!

Nashik Crime News : नाशिकमध्ये क्रूरतेची सर्व सीमा पार! निष्पाप सुनेचा चक्क ८ वेळा सलग गर्भपात, अमानुष मानसिक-शारीरिक छळ; कारण ऐकून पोलीसही हादरले!

Nashik Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीय मानसिकतेचे विष किती खोलवर रुजलेले आहे, याचे विदारक दर्शन घडवणारी एक घटना...

By: Team Navakal
Nashik Crime News
Social + WhatsApp CTA

Nashik Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीय मानसिकतेचे विष किती खोलवर रुजलेले आहे, याचे विदारक दर्शन घडवणारी एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. प्रेमविवाह केल्यानंतरही केवळ ‘जात’ वेगळी असल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “तू आमच्या जातीची नाहीस,” असे बोचरे टोमणे मारत सासरच्यांनी या महिलेला नरकयातना दिल्या असून, तिची संतती आपल्या कुळाची मानली जाणार नाही या अट्टहासापोटी तब्बल आठ वेळा तिचा गर्भपात घडवून आणल्याचा अत्यंत गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या अमानवी छळाला कंटाळून अखेर पीडितेने नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची गुहार लावली आहे.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह प्रेमसंबंधातून झाला होता. मात्र, संसाराची सुरुवातीची काही वर्षे उलटल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या जातीवरून तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. महिलेला जेव्हा जेव्हा गर्भधारणा झाली, तेव्हा सासूने अत्यंत टोकाची भूमिका घेत, “परजातीय स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला आम्ही आमचे वारस म्हणून स्वीकारणार नाही,” असा पवित्रा घेतला. यातूनच वारंवार दबाव तंत्राचा वापर करून आणि शारीरिक छळ करून विवाहितेला आठ वेळा गर्भपातास भाग पाडण्यात आले. मातृत्व लाभापासून तिला वंचित ठेवण्याच्या या क्रूर कृत्यामुळे महिलेच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम झाले आहेत.

केवळ शारीरिक छळ करूनच सासरचे लोक थांबले नाहीत, तर तिला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी धमकावण्यात येत होते. पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे की, तिला सतत शिवीगाळ केली जात असे आणि “तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात कायमचे भरती करू,” अशी भीती सासू-सासऱ्यांकडून घातली जात होती. पीडित महिला पूर्वी पुण्यामध्ये नोकरी करत होती. मात्र, जुलै २०२५ मध्ये ती नाशिकला परतल्यानंतर सासरच्या जाचाने कळस गाठला. तिच्या स्वावलंबनावर घाला घालत तिला घराबाहेर काढण्याची आणि समाजात बदनाम करण्याची भीती सातत्याने दाखवली जात होती.

आर्थिक शोषणाचा पदरही या प्रकरणाला असून, नाशिकमध्ये स्वतःचे घर घेण्याच्या बहाण्याने पतीने विवाहितेचे सर्व सोन्या-चांदीचे दागिने मोडून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःसाठी वापरली. दागिन्यांची लूट केल्यानंतरही त्यांची हाव मिटली नाही आणि माहेरून अधिक हुंडा व पैसे आणण्यासाठी तिचा तगादा सुरूच राहिला. जात वेगळी असल्याने तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या या सासरच्या मंडळींनी तिला घरगुती कामासाठी केवळ एका दासीप्रमाणे वागणूक दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसरूळ पोलिसांनी पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या