Cockroach Janta Party : भारतीय राजकारणाच्या परिघात सध्या एका वेगळ्याच ‘पार्टी’ची आणि तिच्या आगळ्यावेगळ्या जाहीरनाम्याची तुफान चर्चा रंगली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) असे नाव असलेल्या या डिजिटल व्यासपीठाने सोशल मीडियाच्या जगात नवा इतिहास रचला आहे. इन्स्टाग्रामवर सक्रिय झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांच्या अल्प कालावधीत या पार्टीने १०० लाख (१० दशलक्ष) फॉलोअर्सचा टप्पा पार करून सर्वांनाच थक्क केले आहे. विशेष म्हणजे, या लोकप्रियतेच्या शर्यतीत त्यांनी भारतीय जनता पक्षासारख्या बलाढ्य राजकीय पक्षालाही मागे टाकले असून, आता ते काँग्रेसच्या फॉलोअर्सच्या संख्येलाही मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे राजकीय विश्लेषकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
या उपक्रमाचे शिल्पकार छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके हे तरुण आहेत. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘कलमी जाहीरनाम्या’ने सध्या सोशल मीडियावर वैचारिक वादळ निर्माण केले आहे. या जाहीरनाम्यात न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि माध्यम स्वातंत्र्य यांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून, संसदेत महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन या पक्षाने दिले आहे. तसेच केंद्र आणि राज्यातील एकूण कॅबिनेट मंत्रीपदांपैकी निम्मी पदे महिलांसाठी राखीव असावीत, अशी आग्रही भूमिकाही यात मांडण्यात आली आहे.
राजकीय नैतिकतेच्या मुद्द्यावरही सीजेपीने कडक धोरण प्रस्तावित केले आहे. वारंवार पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना चाप लावण्यासाठी, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांवर २० वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास किंवा सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव या जाहीरनाम्यात आहे. याशिवाय, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना, कोणत्याही सरन्यायाधीशांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेची जागा किंवा इतर कोणतेही राजकीय बक्षीस दिले जाणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या संदर्भात तर हा जाहीरनामा थेट अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची आणि विशिष्ट माध्यम प्रतिनिधींच्या बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणी करतो.
निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याबाबत भाष्य करताना, नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा दहशतवादासारखा गंभीर गुन्हा मानला जाईल, असे यात म्हटले आहे. जर कोणतेही वैध मत वगळले गेले, तर संबंधित मुख्य निवडणूक आयुक्तांवर कठोर ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, असाही उल्लेख या जाहीरनाम्यात आहे. या प्रखर आणि धाडसी मुद्द्यांमुळेच हा जाहीरनामा केवळ तरुणांमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.
या पक्षाचे संस्थापक ३० वर्षीय अभिजीत भगवानराव दीपके हे मूळचे वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत. पुण्यातून ब्रॉडकॉस्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केलेले अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. ‘पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट’ म्हणून काम करणाऱ्या अभिजीत यांनी यापूर्वी २०२० ते २०२३ दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.










